पान:विचार सौंदर्य.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११६ 

विचार सौंदर्य


देऊन म्हणा, साहित्यिक कलावन्त आपणास ऋणी करतात. हे कलावन्त केवळ शाब्दिक वेलबुट्टीने आणि रंगीबेरंगी चकाकीनें मन रमवूं म्हणतील, तर क्षणभर मन रमेल कदाचित्; पण लगेच आपण म्हणूं कीं " या कलावंतांची बुद्धि कांहीं विशेष खोल किंवा मार्मिक नाहीं.” थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे कला ही उपदेशगर्भ असलीच पाहिजे असें नाहीं, हें त्रिवार सत्य आहे. कलाकृतीमध्यें कलेचे नियम संभाळले पाहिजेतच आणि हे नियम संभाळून कलात्मक आनंद देणें हेंच त्याचें खरें कार्य. पण कलाकृतींत कलाबन्ताच्या मनाची खोली, प्रगल्भता, विवेकशीलता, मार्मिकता, ज्या मानानें दिसेल त्या मानानें त्या कलाकृतीची किंमत कमीअधिक ठरेल. या गुणांच्या अभावीं ती कलाकृति सुंदरहि दिसूं शकेल; पण तें सौंदर्य दिखाऊ पोकळ असण्याचा संभव आहे. क्वचित्प्रसंगीं हैं सौंदर्य सापाच्या किंवा वाघाच्या किंवा कलावन्तिणीच्या सौंदर्याप्रमाणें धातुकहि होऊं शकेल. असें होऊं न देण्याचा प्रयत्न करणें अवश्य आहे. कलाकृति मोहक असावी, पण भलता मोह तिनें घालूं नये हें सर्वांगीण जीवनाच्या दृष्टीनें उचित आहे.

                                              * * *