पान:विचार सौंदर्य.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयकलाविषयक माझी दृष्टि

११५

' कलेकरिता कला ' या प्रमेयाला दुसरी कांहीं मर्यादा किंवा मुरड घालायची नाहीं ना ?" असा मला जर कोणी प्रश्न केला तर मी म्हणेन कीं 'नाहीं', आणखी कांहीं मुरड बिरड घालायची नाही. पण एक मुद्दा मात्र मला स्पष्ट करायचा आहे. तो असा की, ज्या कलावन्ताला कांहीं एक सांगावयाचें नाहीं, ज्याच्याजवळ सांगण्यासारखें कांहीं नाहीं, त्याची कला मुलांच्या रबरी फुग्यासारखी दिसण्यांत सुंदर, पण अगदी पोकळ असेल. अशा कलेला विशेष कांहीं किंमत नाहीं. प्रा. फडक्यांच्याच कलात्मक कादंबऱ्या घेतल्या तरी त्यामध्यें प्रा. फडक्यांना संसारांत जीं चमत्कृतिजनक दृश्यें दिसलीं आणि जीं त्यांना इतरांना सांगावीशी वाटलीं तींच त्यांनीं कलात्मक रीतीनें वर्णिलेली आहेत ना ? संसारांतील हीं चमत्कृतिजनक दृश्यें हुडकून काढण्यांत त्यांचा मार्मिकपणा दिसून येतो. हा मार्मिकपणा त्यांच्यामध्यें नसता तर त्यांचीं वर्णनें विशेष आनंददायक झाली असती काय ? वाङ्मयीन कलावन्त जें सांगेल त्यांत जितका खोलपणा, जितका मार्मिकपणा, जितकें अर्थवैभव असेल त्या मानानें त्याची योग्यता कमीअधिक. कर्णमधुर शब्दावडंबर, शुष्क कोट्या, क्षणभर चकित करणारे शब्दश्लेष, इत्यादिकांमध्ये जी थोडीबहुत चमत्कृति आहे तिच्यामुळे मनाची क्षणभर करमणूक होते एवढेंच तिचें महत्त्व. डोंबाऱ्याचे खेळ किंवा माकडाच्या उलट्यासुलट्या उड्या पाहून क्षणभर आपण हंसतों त्यांतलाच तो प्रकार अशा लोकांची किंमत बेताचीच. शेक्सपियर, टॉमस हार्डी, आपले फडके, इत्यादिकांनी आपल्या कलाकृतींमध्ये मानवी स्वभावविशेष, मानवी संसारांतील पेंचप्रसंग, मानवी मनामध्यें आंतल्याआंत चाललेले कलह किंवा उलटसुलट प्रवाह, मानवी मनांतील बऱ्यावाईट विचारांची, भावनांची आणि प्रवृत्तींची विलक्षण गुंतागुंत, इत्यादिकांचीं जीं शब्दचित्रें काढिलीं आहेत त्यांवरून 'अशा रीतीने वागा किंवा वागूं नका' असे सांगितलें नसेल, पण तीं शब्दचित्रे पाहिल्याबरोबर जें पूर्वी आपणांस दिसले नव्हतें, किंवा निदान स्पष्टपणें दिसलें नव्हतें, तें आपण आज पाहिलें असें आपणांस वाटतें आणि आपल्या अनुभवांत चांगली भर पडली असा प्रत्यय येऊन आनंद होतो ही गोष्ट निर्विवाद आहे. कित्येक वेळां अनुभवांमध्ये भर पडत नाहीं, तर स्वानुभवाचा पुनःप्रत्यय येतो. भर घालून म्हणा किंवा पुनःप्रत्यय आणून