पान:विचार सौंदर्य.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११४ 

विचार सौंदर्य

केवळ कलामय नाहीं. जीवनांत ज्या अत्यंत रम्य आणि वंद्य गोष्टी आहेत त्यांत कलेबरोबर नीतीचा आणि सत्याचाहि समावेश होतो आणि यांचें जर एकमेकांत पटले नाहीं तर जीवनांतली ती मोठीच आपत्ति म्हटली पाहिजे. जीवनांत कला नसेल तर तें बेचव, नीरस, कळाहीन होईल हें खरें, पण सत्य नसेल तर तें लुलें, आंधळे, पांगळें होईल, आणि नीति नसेल तर तें रोगट, कुजकें, नासकें होईल. अर्थात् या तिहींपैकीं कोणाचेंहि अनिर्बंध असें स्तोम माजविण्यांत आणि कोणालाहि शेफारूं देण्यांत अर्थ नाहीं. कलेला काय, नीतीला काय किंवा सत्याला काय, आपापल्या क्षेत्रांत सामान्यतः स्वातंत्र्य असावें. हें एक ध्यानांत धरावें कीं, कलेचा कलह पुष्कळ वेळां होतो तो खऱ्या नीतीशीं किंवा उच्चत्तम सत्याशीं नसतोच मुळीं. पुष्कळ वेळां मीं असें पाहिले आहे कीं,नीतीचा आणि सत्याचा मक्ता जणूं कांहीं आपल्याकडेच आहे असे समजणाऱ्या आकुंचित बुद्धीच्या भक्तगणांनीं नसता कलह उत्पन्न करून उगाच वावटळ उत्पन्न केलेली असते. कांहीं प्रामाणिक नीतिभक्तांना विनोदबुद्धीच नसते आणि आपल्या उणीवेची त्यांना जाणीव नसल्यामुळे ते नाकानें कांदे सोलून डोळ्यांतून उगाच आसवें गाळतात आणि पावित्र्यविडंबनाची वगैरे कोल्हेकुई उठवून देतात. असल्या विनोदबुद्धिहीन नीतिभक्तांना ताळ्यावर आणण्याकरितां कांहीं एकान्तिक कलात्मक व कलैकपुरस्कारक लोक असणें समाजाच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. खरी गोष्ट अशी आहे कीं, कलेच्या दृष्टीने पाहतां येणें ही गोष्ट सोपी नाहीं.

 हें प्रांजलपणें कबूल केल्यानंतर 'कलेकरितां कला' या प्रमेयाला मुरड कशी घातली पाहिजे हें थोडक्यांत सांगण्यास हरकत नाहीं. 'कलेकरितां कला' हें जितकें खरें आहे त्याहून कला हें एक जीवनाचें अंग आहे, तें जीवनसर्वस्व नव्हे, हें अधिक खरें आहे. 'आनंद' हें कलेचें अवतारकृत्य खरें पण नीतीच्या नरड्याला नख लावून किंवा सत्य पायाखालीं तुडवून कला नाच करूं लागली तर सात्त्विक आनंद मिळू शकेलं काय ? अर्थात् नाहीं.

 आतां मला कोणी असें विचारील कीं,"वामनराव, सत्याला किंवा नीतीला दुखविणारें किंवा चिरडणारें कलेचें बेबंद तांडवनृत्य तुम्हाला नको हें वादाकरितां क्षणभर आम्ही कबूल करितों. आतां यापुढे तरी तुम्हांला