पान:विचार सौंदर्य.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयकलाविषयक माझी दृष्टि

११३

किंवा कवीनें वनश्रीचें किंवा राजवाड्याचें किंवा एखाद्या गरीबाच्या झोंपडीचें चांगलें चटकदार वर्णन केले तर त्यावेळी कोणी असा प्रश्न काढीत नाहीं कीं, या वर्णनापासून काय बोध घ्यायचा ? पण रूढ कल्पनांना, नीतिनियमांना, चालीरीतींना धक्का देणारें वर्णन कितीहि चांगले असलें कीं, किंबहुना चांगले असते म्हणूनच – वाद निघतो की असले लिखाण योग्य की अयोग्य ?

 या विषयासंबंधी माझें मत दहापंधरा मिनिटांत सांगायचें आहे म्हणून मी असें म्हणेन कीं, 'कलेकरितां कला' हें प्रमेय मला सामान्यतः मान्य आहे. 'सामान्यतः' या शब्दावर मी जोर देत आहे. कारण मी या प्रमेयाला कांहीं अपवादात्मक परिस्थितीत थोडीशी मर्यादा आणि मुरड घालूं इच्छितों. मघांशी आपण खेळण्याचे एक उदाहरण घेतलें. खेळतांना प्रतिपक्षाला हूल देऊन फसविण्यांत कांहीं पाप नाहीं हें खरें आहे, त्याचप्रमाणे त्याचा पराभव झाला असतां त्याला जें दुःख होईल तिकडे पाहावयाचें नसतें हेंहि खरें आहे, पण त्याचा जीव जाईल किंवा त्याला मोठी दुखापत होईल अशा रीतीनें खेळ खेळणेंहि उचित नाहीं असें आपण मानतोंच ना ? क्रिकेट खेळतांना अंगाला दुखापत होईल अशा प्रकारचें आततायीपणाचें 'अंग-झोडपें' म्हणजे (Bodyline) बोलिंग बरेच लोक अशिष्टपणाचें समजतात तें उगाच नाहीं. कलेचा खेळ खेळतांना "तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो " असें गोष्टींतल्या बेडकांप्रमाणें म्हणण्याची पाळी जनतेवर येऊं नये इतकी काळजी कलाक्रीडा करणाऱ्यांनी घ्यावी असे मला वाटतें.

 साहित्यकलेला स्वातंत्र्य असावें, तिला पायबंद कोणी घालूं नये, आनंद देणें हेंच तिचें अवतारकृत्य आणि तेंच तिचें सौभाग्य, आपल्या मंदिरांत तरी तिला राणीचा मान पाहिजे, जराजर्जर रूढीचा, निर्दय नीतीचा किंवा कल्पनाशून्य सत्यप्रीतीचा तिला सासुरवास नसावा, या आणि अशा सर्व गोष्टी मला मान्य आहेत. पण कलेचा आणि साहित्यकलेचा मी भक्त असलों, तरी मी अनन्य भक्त नाहीं. मला केव्हांहि हें विसरतां येत नाहीं कीं मनुष्याचा जन्म केवळ कलेचा आनंद लुटण्याकरितां नाहीं. कला नसेल तर मनुष्याच्या जीवनांत तें मोठेंच वैगुण्य होईल पण जीवन हें

 वि. सौं....८