पान:विचार सौंदर्य.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११० 

विचार सौंदर्य


इतकेंच नव्हे तर धातुक आहे. आधीं हें 'समाजहित' ठरवावयाचें कोणी ? हें समाजहित साध्य कसे करावयाचें हेंहि ठरवावयाचें कोणी ?

 हल्लींच्या स्वातंत्र्यवादाच्या युगांत लेनिन-स्टॅलिन-गांधी-नेहरू यांच्या सारख्या लोकहितपर व्यक्तींनींहि जरी म्हटलें कीं अमुक कलावन्तानें अमुक प्रकारची कलानिर्मिति करावी तर माझ्यासारख्यांना तरी तत्त्वदृष्ट्या पटणार नाहीं. एक तर असल्या व्यक्ति अलौकिक असल्या तरी त्याहि स्खलनशील असतात, आणि त्यांच्या हातीं आपली शेंडी, म्हणजे आपलें कलास्वातंत्र्य, देणें स्वातंत्र्यप्रिय व्यक्तीला समर्थक प्रबल कारण दाखविल्याशिवाय योग्य वाटणार नाहीं. दुसरें असें की, या व्यक्ति कितीहि चांगल्या असल्या तरी सर्वाधिकार चालविण्याची संधि वारंवार दिली गेल्यास त्यांना ती संवय किंवा चटकच लागते आणि लोकहिताच्या दृष्टीनें तें योग्य नव्हे. तिसरें असें कीं, अमुक एक प्रकारची व ध्येयाची कलानिर्मिति पाहिजे अशा नियंत्रणाचा कलावन्ताच्या स्वैरविकासाला व विहाराला बाधच होतो, आणि त्याच्या कलेला कमी-अधिक प्रमाणांत वैगुण्य येतें, चवथें असें कीं पर-प्रेरित आणि पर-नियंत्रित नीतिमत्ता जशी खरी नीतिमत्ता नव्हे, त्याचप्रमाणें पर- प्रेरित व पर नियंत्रित कला बाह्यतः कितीहि चांगली दिसली तरी खरी कलाच नव्हे. कला काय, नीति काय किंवा सत्यप्रीति काय, पूर्ण स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेंतच फोफावते, फुलते आणि सुफलदायी होते. सामान्यतः जिचा तिचा स्वधर्म तिला मोक्षदायक; परधर्म हा केव्हांहि अधःपाताला कारणीभूत. मग तो नीतीचा असो, किंवा सत्यदेवतेचा असो.

 प्राध्यापक फडके यांचेंहि असेंच मत आहे, पण वर दिग्दर्शित केल्याप्रमाणें एकाच अंतरात्म्यांत कला-नीति वगैरेंना नांदावयाचें असल्यामुळे, विशिष्ट मर्यादेनंतर एकमेकींचीं क्षेत्रे इतरांच्या क्षेत्रांतून जात असल्यामुळे, आणि शिवाय तत्त्वतः त्यांच्यामध्यें अन्योन्याश्रय असल्यामुळे अपवादात्मक प्रसंगीं एकमेकींची सोय एकमेकींनीं पाहावी एवढेच माझें म्हणणें. दुसरें असें कीं कला हा एक क्रीडेचा प्रकार; नीति ही मोलकरीण व कला ही मालकीण; वाङ्मयात्मक कलाकृतींनीं समाजाच्या सुधारणेला फारशी मदत केलेली नाहीं, वगैरे विधानें मला अतिशयोक्त वाटतात. भाई डांगे, फडके, देशपांडे, पेंडसे वगैरेंची मतेंहि कांहीं अंशीं मला मान्य आहेत व कांहीं अंशीं अमान्य