पान:विचार सौंदर्य.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मय कालनिष्ट की व्यक्तिनिष्ठ

१०९

ठेवावें हैं म्हणणें अतिशयोक्त दिसतें. एखाद्या चित्रकाराचें हृदय मजुरांच्या हालअपेष्टा पाहून किंवा ऐकून द्रवले आणि त्यानें गरिबांच्या हालांचीं दृश्यें चितारून लोकांचीं हृदयें द्रवविलीं व मजुरांना अनुकूल करून घेतलीं तर त्याचें तें करणें मी स्तुत्यर्ह समजेन. एखाद्या गायनपटु कलावन्तानें मजुरांना उत्साहवर्धक असें गायन करून व काव्यकलापटु कवीनें हृदयस्पर्शी पदें, पोवाडे वगैरे वगैरे रचून मजुरांच्या कार्याला साहाय्य केलें तर तें अभिनंदनीय व पुण्यप्रद आहे. समाजांत अन्नानदशा येऊन, धुमश्चक्री उडून अंदाधुंदी होऊन समाजाला खरोखर आग लागल्यासारखें झालें तर कवींनीं व इतर कलावन्तांनीं सुद्धां. आपापली चित्तरंजनात्मक कार्ये टाकून दिलीं पाहिजेत हैं मी मान्य करितों. पण असा आत्यंतिक व अपवादात्मक प्रसंग ओढवला नसतां कवि, गायनपटु, चित्रकार यांनी आपापली कामें म्हणजे 'स्वधर्म' आचरीत राहण्यांतच समाजाचें हित आहे,- 'परधर्म ' हा भयावह आहे-असे मला वाटतें. भाई डांगे, फडके यांना मला असें विचारावेंसें वाटतें कीं कोठें संप पुकारला गेला, किंवा गरिबांवर जुलूमजबरदस्ती झाली, कीं, आसपासच्या सर्व पत्न्यांनी पत्नीधर्म टाकून मजूर स्त्रियांच्या मिरवणुकत सामील व्हावें, सर्व मुलांनी आपले शिकण्याचें कर्तव्य सोडून घोळक्यांत मिळून ' इन्किलाब झिंदाबाद ' ओरडत राहावें, असें तुम्हांस खरोखरच वाटतें काय ? असें जर नसेल तर कलावंतांवरच कां एवढा रोख ? कलावंतानें खरोखर सामान्यतः आपल्या कलेच्या ध्येयापेक्षां व नियमापेक्षां दुसरी-तिसरीकडे पाहूं नये. कलात्मक आनंद देणें- घेणें हेंच त्याचें ध्येय असावें आणि कलाविषयक जे नियम त्यांची त्यानें नियमनें मानावीत नीति, बोध, समाजहित वगैरेंकडे सामान्यतः त्यानें लक्षच देऊं नये. असामान्य परिस्थितींत मात्र या तत्त्वाला मुरड घातली पाहिजे पण अशी परिस्थिति अपवादात्मक असणार. कलावन्तानें कला हीच देवता मानावी आणि तिची अनन्यभक्ति करावी, हें प्राध्यात्मक फडके यांचें मत मला मान्य आहे, पण 'सामान्यतः ' हा शब्द मी त्या वाक्यांत घालूं इच्छितों हेंहि लगेच सांगतों. कला ही समाजहितोन्मुख असली तर उत्तमच, पण प्रत्येक कलावन्तानें प्रत्येक वेळीं समाजहिताकडे नजर लावून आपल्या कलेचा विलास करावा हें म्हणणें दुराग्रहाचें आहे.