पान:विचार सौंदर्य.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०८ 

विचार सौंदर्य

त्याला विरोधक तत्त्व डोकें काढतें आणि या द्वंद्वांत युद्ध होऊन पूर्वीहून उच्चतर असलेलें उन्नतीचें बीजरूप तत्त्व निघतें; आणि अशा विरोध- विकासात्मक परंपरेनें प्रगतिपथ आक्रमीत आक्रमीत समाज पूर्णावस्थेला जाऊं पाहत असतो; आणि शेवटीं सांगावयाचें असें कीं, जिवंत वाङ्मयांत तत्तत्कालीन विरोधी द्वंद्वांच्या संघर्षाचें प्रतिबिंब पडतें इतकेच नव्हे तर तें पडलेंच पाहिजे, नाहीं तर तें समाजजीवनाशी फारकत झालेलें, अयथार्थ व निरुपयोगी आहे. हे आशय देण्यामध्यें माझी चूक झाली असल्यास या व्यक्तींनी मला क्षमा करावी. त्यांच्यावर टीका करण्याचा हेतु नसून अशा प्रकारची जर कोणाचीं मर्ते असतील तर त्या मतावर टीका करण्याचा माझा रोख आहे. मला वाटतें या मतांत ग्राह्यांश हा कीं, कलावन्त हा समाजाचा एक घटक आहे आणि त्यानें व्यक्तिसुखापेक्षां समाजहिता कडे अधिक लक्ष द्यावें हें एक चांगले तत्त्व त्यांत गर्भित आहे. पण या तत्वाच्या अधिकारमर्यादेची जाणीव जागृत नसल्यास व ‘औचित्य' विचार सोडल्यास तें घातुक होईल. मला हें समजतें कीं, आपल्या घराला आग लागली असल्यास गणिताच्या प्राध्यापकानें पाण्याच्या दाबाविषयीं गणितें न सोडवितां पाण्याची बादली उचलावी; चिताऱ्यानें सुंदर स्त्रीचें किंवा बालकाचें चित्र रंगविण्यापेक्षा आपल्या बायकोला व मुलांबाळांना वांचविण्याचा प्रयत्न करावा; गायनपटु गायकानें गोड आवाजांत करुण रसाचें पद न आळवितां कर्णकटु आरडाओरड करून शेजाऱ्याापाजाऱ्यांची मदत आणवावी. पण असले आत्यंतिक प्रसंग अपवादात्मक होत. एरव्हीं ज्यानें त्यानें आपआपलें काम उत्तम तऱ्हेनें करीत राहावें ('स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः') हेंच तत्त्व अनुसरण्यासारखें. डांगे, फडके वगैरे लोकांचें हें म्हणणें मी मान्य करीन कीं गोकाक किंवा सोलापूर किंवा उज्जयिनी येथें संप झाला असतां ( आणि तो योग्य कारणास्तव झाला असतां ) सर्व लोकांनीं गरीब मजुरांबद्दल सहानुभूति दाखवावी, आणि शक्य तेवढी त्यांना मदत करावी, ज्याला तेवढा उत्साह असेल त्यानें त्यांच्याकरितां पुष्कळसा-नव्हे सर्वस्वाचा देखील त्याग करावा, पण प्रत्येकानें प्रत्येक संपाच्या वेळीं आपापलें अध्यापनाचें, चित्रणाचें, वादनाचें, काव्यगायनाचें, काव्यनिर्मितीचें वगैरे काम बाजूला