पान:विचार सौंदर्य.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मय कालनिष्ट की व्यक्तिनिष्ठ

१०७

सलोख्यानें वागतील ? आशा एवढीच कीं, कालान्तरानें हेहि दिवस जातील, आणि व्यक्तीला काय किंवा समाजाला काय जें सत्य तेंच शिव व सुंदर वाटू लागेल, जें सुंदर त्यांतच सत्य आणि शिवत्व प्रतिबिंबित होईल, आणि जें शिव तें बुद्धीला सत्य म्हणून पटेल आणि भावनांना सौंदर्यपूर्ण वाटेल !

 समाजाच्या व व्यक्तीच्या अपूर्णावस्थेत वरील तिन्ही अंगांमध्यें विरोध कसा उत्पन्न होतो याचें एक उदाहरण म्हणून अलीकडे कांहीं साम्यवादी अथवा विश्वकुटुंबवादी लोक जीवनाकरितां कला आहे याविषयीं जें बोलतात त्याचा विचार करण्यासारखा आहे. पुणे येथील एका भाषणांत भाई कृ. ना. फडके यांनी पुढील आशयाचें भाषण तावातावानें केलें. ते म्हणाले कीं, रवींद्रनाथ टागोरांसारख्यांचीं काव्यें कलादृष्ट्या कितीहि गोड असलीं, तरी देशाला आग लागली असतां, गरीब लोक अन्नान्न करून मरत असतां असलीं गाणीं रचणें किंवा त्यांत दंग होणें वेडेपणाचें होय.' रोमला आग लागली असता रोमचा अधिपति नीरो हा वाद्यवादनांत गुंग झाला होता (‘Nero was fiddling when Rome was burning') हें जसें त्याला दूषणाई तसेंच रवींद्रनाथांसारख्यांचीं काव्यें समाजहिताकडे दुर्लक्ष करणारी असल्यास तीं दूषणाई व त्याज्य होत, असा त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ. ( भाई फडके हे अर्थात् प्राध्यापक फडके यांच्या विरुद्ध आहेत, कारण प्रा. फडके हे कलार्थ कलावादी आहेत, कलावन्तांनीं कलात्मक आनंदापेक्षां इतर गोष्टी पहावयाच्या नाहींत असें म्हणणारे आहेत.) दुसरे एक सुविद्य व सुप्रसिद्ध साम्यवादपुरस्कर्ते भाई डांगे हे पुणे येथीलच एका भाषणांत म्हणाले कीं, गोकाकच्या धबधब्याजवळ एखादा चितारी गेला आणि त्यानें तेथील पर्वतश्री व जलवैभव चित्रित करण्याचा प्रयत्न केला आणि अर्थात् अप्रत्यक्षपणे गोकाक येथील गिरणींत काम करणाऱ्या मजुरांच्या हालाकडे दुर्लक्ष केलें, तर त्याची चित्रकला व्यर्थ आहे. ' श्री. पु. य. देशपांडे यांचें म्हणणें असें दिसतें, समाजांतील तत्तत्कालीन अंतःकलहांत विरोधी तत्त्वांचा संघर्ष किंवा झगडा असतो, समाजाची प्रगति विरोधी द्वंद्वांच्या संघर्षातून म्हणजे झगड्यांतून निघणाऱ्या उच्चतर तत्त्वामध्ये असते; आणि हें उच्चतर तत्व पुढे एकांगी ठरल्यामुळे