पान:विचार सौंदर्य.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मय कालनिष्ट कीं व्यक्तिनिष्ठ

१०५

येईल. विशिष्ट व्यक्तींच्या विशिष्ट मनोवस्थेला ही उपपत्ति बरोबर लागू पडेल; ती सर्वत्र, सर्वदा आणि सर्व व्यक्तींच्या बाबतींत लागू पडेल असें नाहीं. इतर उपपत्तींचें असेंच आहे. मौज अशी आहे कीं, वाङ्मयाला क्रीडा ठरविणाऱ्या प्रो. फडक्यांनीं 'प्रतिभासाधन' नामक आपल्या सुंदर ग्रंथांत भाषाशैलीविषयीं लिहितांना लेखकाला अंतःकरण पाहिजे, तरच त्याला उत्तम भाषाशैली साध्य करतां येईल असे म्हटले आहे आणि वाङ्मय म्हणजे केवळ क्रीडा नव्हे असें सूचित केले आहे. मला वाटतें त्याच प्रकरणांत त्यांनीं ' विचार-सौंदर्या 'चा उल्लेख केला आहे. हें सौंदर्य विचारांच्या मांडणीचें असून तें त्यांच्या गहनत्वावर अवलंबून नाहीं असें ते म्हणतील. अपक्क किंवा अयथार्थ विचारांची मांडणी कितीहि सुंदर केली तरी तिनें ललित वाङ्मयाचें 'आनंद' हें जें ध्येय तें परिपूर्णतेनें साध्य होईल काय ? आणि दोन ललित कृतींत मांडणी सारखीच सुंदर आहे आणि विचारांच्या गहनतेंत मात्र मूल्यभेद आहे, तर या ललित कृतींच्या मूल्यमीमांसेंत अधिक गुण गहन विचारात्मक कृतीला प्रा. फडके देणार नाहींत काय ? तसेंच कलेचें ध्येय 'आनंद' हें ठरल्यावर या आनंदामध्ये माती किंवा विष कालविणारा भाग ललित वाङ्मयांत येणें अप्रशस्त; अर्थात् नैतिक दृष्ट्या आनंदाला कलुषित किंवा शबलित करणारा भाग ललितकृतीला गौणत्व आणणारा आहे हैं देखील प्रो. फडके यांना मान्य करण्यास हरकत नसावी. ज्ञानप्रिय, नीतिप्रिय व कलाप्रिय असे मनाचे तीन भाग आपण मानतों, पण हे विभाग सोईसाठीं कल्पिलेले आहेत एवढेंच. वास्तविक हे ' विभाग ' विभिन्न नाहीत, तर अन्योन्यसापेक्ष, अन्योन्याश्रयी व अन्योन्यसंस्कारक आहेत. अर्थात् एका विभागाचा किंवा अंगाचा विचार करतांना इतर अंगांकडे सोईसाठीं दुर्लक्ष करणें वेगळें, आणि दुसऱ्या अंगांना दुखापत झाली व हायहाय असे उद्गार तोंडांतून बाहेर पडूं लागले तरी त्या अंगांवर बेफिकीर वृत्तीने आणि जाणून उमजून प्रहार करीत राहणें निराळें. आतां एवढी मात्र गोष्ट खरी कीं, मनाच्या संसारांत कलेला, नीतीला आणि सत्याला एकत्र नांदावयाचें आहे, आणि त्यांची पूर्णावस्थेतील ध्येयें सुसंवादी असली तरी अपूर्णावस्थेंतील ध्येयें विशिष्ट मर्यादेनंतर विसंवादी होऊं लागतात,तेव्हां होतां होईतों त्यांनीं आपापल्या क्षेत्राबाहेर फारसें पाहूं