पान:विचार सौंदर्य.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०४ 

विचार सौंदर्य

स्त्रिया पुरुषद्वेष करितात, त्या भीरु असतात, म्हणूनच कित्येकवेळां उद्धटपणें वागतात. धाडसी गुन्हेगार हेहि खरोखर भित्रे असतात, धर्ममठांत जाणाऱ्या सच्छील जोगिणींच्या मनांत सुप्त कामवासना असते, अशाप्रकारचे दाखले आहेत. एखाद्या मोठ्या किल्लयांत ज्याप्रमाणे दिवाणखाने, हिरे-माणकें, झुंबरें, गाद्यागिरद्या, सुवासिक तेलें व अत्तरें असतात आणि त्याचबरोबर घाणेरडें पाणी वाहून नेणारे नळ, गटारें, पायखाने वगैरेहि असतात. उत्तम कलावंत आणि सच्छील ब्राह्मणहि तेथें दिसतात, त्याचप्रमाणे कलावंतिणी व बदमाष लोक यांचीहि तेथें कमतरता नसते; त्याचप्रमाणें मनाची स्थिति आहे. किल्लयांत गुप्त भुयारें असतात, गुप्त दारुखाने असतात, गुप्त पोलिस असतात, त्याप्रमाणें मनांतहि अनेक बरीवाईट गुप्तें असतात. अशा या मनाची पूर्ण मीमांसा कोण करणार ? प्रतिभावान् मनुष्याबद्दल तर फारच मौजेचें गहन-गूढत्व. कांहीं त्यांना 'दैवी' म्हणणार, तर ड्रायडन हा कवि ' Genius to madness is near allied ' असें म्हणणार ! शेक्सपिअर तर कामी जन, कवि आणि वेडे यांना एका पंक्तींत बसवून श्वा, युवा व मघवा यांना एका सूत्रांत ओंवणाऱ्या पाणिनीवर ताण करतो ! पॅव्हलाव्ह (Pavlov) व इतर वर्तनवादी (Behaviourists) मनाला नियमाच्या कक्षेत आणूं पाहत आहेत, पण अद्यापि हें अणूहून अणु असलेले मन त्यांना झुकांड्या देत आहे. अशा या लोकविलक्षण मनाची मीमांसा करतांना अनेक सहज-प्रेरणा, अनेक सुप्त गुप्त व प्रकट वासना, अनेक इच्छा-आकांक्षा, त्यांचें अस्तित्व, त्यांच्या गुंतागुंती आणि अंतःकलह, इत्यादि सर्व गोष्टी ध्यानांत घेतल्या पाहिजेत. केवळ प्रकट किंवा सुप्त काम किंवा लोभ, अशा प्रकारच्या एकाच तत्त्वाच्या आधारें विवेचन करणे धाडसाचें व धोक्याचें आहे.

 'कारणानामनेकता' (Plurality of causes) हें तत्त्व मान्य केल्यास ललितवाङ्मय हें खऱ्या जगाला विसरण्याकरितां आहे (It is an escape from life), खऱ्या जगांत जें सुख मिळत नाहीं तें कल्पनासृष्टींतल्या मनोराज्यांत तरी उपभोगूं या अशा भावनेनें सेविलें जातें, तें केवळ आनंदाकरितां असतें, ती एक प्रकारची क्रीडा आहे, ती अफू आहे, इत्यादि प्रा. फडके प्रभृतींच्या मतांचाहि एकांगीपणा दिसून