पान:विचार सौंदर्य.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मय कालनिष्ट की व्यक्तिनिष्ठ

१०३

तरच मातीचें मडकें होईल आणि सुवर्ण असलें तरच सुवर्णाचा अलंकार, असें म्हणण्यासारखेंच बरेंचसें अनुवादात्मक (tautological) आहे!

 विशिष्ट परिस्थितींत विशिष्ट समाजांत जे वाङ्मय असते त्याला एक कारण नसून अनेक कारणे असतात. त्या समाजाचा पूर्वेतिहास, तत्कालीन धर्म, चालीरीति सांस्कृतिक दर्जा, इतर लोकांशी असलेला संबंध, नैतिक आचारविचार, धार्मिक भावना, आर्थिक आकांक्षांना मिळत असलेला वाव किंवा त्याचा अभाव, तत्कालीन समाजांत युगप्रवर्तक व अलौकिक व्यक्तींचें अस्तित्व किंवा त्यांचा अभाव, त्याचप्रमाणे त्या त्या वाङ्मयसेवकाची मनाची ठेवण, त्याचें शिक्षण, त्याचा सामाजिक दर्जा, त्याच्या इच्छा-आकांक्षा, त्याची तृप्ति-अतृप्ति, त्याच्या सुप्त किंवा नेणिवेंत दडलेल्या किंवा दाबलेल्या इच्छा-आकांक्षा, त्याच्या सहज-प्रेरणांचें सापेक्ष बलाबल, त्याच्या जाणीवयुक्त भाव-भावना, त्याच्या नेणिवेंतील मनोगंड (complexes) इत्यादि अनेक व अनेकविध कारणांवर त्या त्या वाङ्मयसेवकाचें वाङ्मय अवलंबून असतें. त्यांतील एखाद-दुसरें कामवासनात्मक किंवा आर्थिक अंग घेऊन त्याच्या आधारेंच सर्व कारणमीमांसा करावयाची यांत यथार्थ-प्रतीतीपेक्षां अपूर्ण विचारोत्पन्न अभिनिवेश अधिक दिसतो. आर्धी मन ही चीज काय आहे हे अद्यापि कळलेलें नाहीं. त्याचे व्यापार कांहीं कळले आहेत, पण अज्ञात, प्रच्छन्न, सुप्त, नेणिवेंत दडलेले व दडपलेले असे, व्यापारहि त्याचे असतात हेंहि आतां थोडेबहुत कळलें आहे. मनांत क्रोधलोभादि अनेक मनोविकार आहेत, कामप्रेरणादि अनेक बऱ्यावाईट प्रेरणा आहेत, त्यांची गुंतागुंत विलक्षण आहे, इत्यादि गोष्टी ज्याला कळल्या आहेत, तो सामान्य व्यक्तीच्या मनोव्यापारांचीहि निश्चित व परिपूर्ण मीमांसा आपणांस झालेली आहे असें म्हणणार नाहीं; मग प्रतिभावान् लोकांच्या मनोव्यापारांची मीमांसा छातीठोकपणें करणें तर दूरच राहिलें, आणि सामाजिक मनोरचनेचें निरपवाद व निःशंक शास्त्र बनवूं पाहणें हें तर त्याहूनहि दूर ! तोतरें बोलणारा मनुष्य मोठा वक्ता होईल असें आपणांस वाटतें काय ! पण ग्रीस देशांतील प्रसिद्ध वक्ता डेमॉस्थेनिस हा तोतरा होता तरी देखील नव्हे, तर तोतरा होता म्हणून, प्रसिद्ध वक्ता झाला हें अॅडलर या मानसशास्त्रज्ञाचें मत आहे, आणि तें खरें दिसतें. पुरुषविषयक प्रेम असते म्हणूनच कांहीं