पान:विचार सौंदर्य.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०२ 

विचार सौंदर्य

पाहतो, तर फ्राईडला तीं कामवासनेंत (Sexuality) व क्वचित् प्रसंगीं आत्माभिमानांत (Ego-instinct) गुरफटलेली दिसतात. यावरून गूढ नेणिवेंतल्या (unconscious) प्रेरणांबद्दल निश्चित मत देणें किती कठीण आहे हें स्पष्ट होतें. मग परिस्थितीचा व मनोरचनेचा व प्रतिभेचा कांहींच संबंध नाहीं काय ? संबंध अर्थात् आहे. पण हा संबंध कोणत्या प्रकारचा आहे तें कळल्यावर बादरायणसंबंधाहून तो किंचित् अधिक निकट आहे याहून अन्य असें कांहीं अनुमान निघत नाहीं. एक मोठा शिलाखंड पाहिल्यावर कोणी त्याचा पायरीसाठी उपयोग करील, कोणी त्यांतून मूर्ति निर्माण करण्याची आकांक्षा करील, व कोणी त्याची खडी करून रस्त्यावर पसरण्याचा उपयोग करील. दगड हैं या सर्व विचारात्मक प्रत्युत्तरांचें (Reactions) कारण आहे. पण हें कबूल केल्यानें विशेष निष्पन्न काय झालें ? एखाद्या रूपवतीला पाहून कोणी लाजेल, कोणी मोकळ्या मनानें तिच्यापुढे जाईल, कोणी तिच्याकडे चोरून पाहील, कोणी धारिष्ट्यानें नेत्रसंदेश पाठवील, कोणी दुसरें कांहीं करील. ह्या सर्व प्रत्युत्तरांना (Reactions) ती रूपवती कारणीभूत आहे. पण तिचें हें कारणत्व कबूल केल्यानें त्या त्या व्यक्तींच्या विशेषांच्या कारणत्वांचें महत्त्व कमी होईल काय ? साप पाहिल्याबरोबर कोणी त्याला मारण्याकरितां काठी घेऊन धावेल, कोणी तेथून पळून जाईल, कोणी ओरडूं लागेल; या सर्वोच्या प्रत्युत्तरांना तो साप कारणीभूत आहे हें खरेंच आहे, कारण साप नसता तर कोणी कोणाला झोडपलें नसतें, कोणी उगाचच पळून गेला नसता आणि कोणी नाहक ओरडले नसतें. पण झोडपणें, पळणें, ओरडणें या क्रिया सापाच्या अस्तित्वावर अवलंबून आहेत असें म्हणणें अधिक संयुक्तिक, का त्या त्या स्वभावविशेषांवर अवलंबून आहेत असे म्हणणें अधिक सयुक्तिक ? राजकीय किंवा आर्थिक परिस्थिति आणि प्रतिभा यांचा संबंध ठरवितांना वरील विचारसरणी ध्यानांत ठेवावी. विशिष्ट परिस्थिति ही नसतीच, म्हणजे तिचा अत्यंताभाव असता, तर प्रतिभावान् मनुष्य ती परिस्थिति असतांना जसें वागला तसे वागला नसता हें उघडच आहे, कारण त्या परिस्थितीचा अभावच असला तर त्या परिस्थितींतलें वागणेंहि अशक्य आहे, पण परिस्थितीचें हें कर्तृत्व मान्य करणे म्हणजे माती असली