पान:विचार सौंदर्य.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मय कालनिष्ठ कीं व्यक्तिनिष्ठ

१०१

 तुकाराम किंवा इतर महाराष्ट्रीय संतकवि दैववादी, संन्यासवादी, निवृत्ति- मार्गी होते याचें कारण तत्कालीनं राजकीय बिकट परिस्थिति किंवा आर्थिक रचना, हें गृहीत धरणाऱ्यांना त्या त्या कवींच्या बोधयुक्त अथवा जाणीव- युक्त मनामध्ये त्या राजकीय वा आर्थिक परिस्थितीचा विचार होता हैं तर सिद्ध नाहींच करतां येत आणि हे विचार अबुद्धिपुरःसर त्यांच्या मनावर संस्कार करीत होते असे म्हणावें तर त्यांना किंवा कोणालाहि हें सिद्ध करतां येणें अशक्यच; कारण त्याची त्यांनाच जेथें जाणीव नव्हती तेथें इतरांना ती कशी असणार ? येवढे मात्र खरें कीं, हीं गोष्ट तद्विरुद्ध पक्षीयांना, म्हणजे माझ्यासारख्यांना, खोटी असेंहि सिद्ध करतां येत नाहीं. कारण सर्वच जेथें गूढ, अज्ञात, अंधकारमय, तेथें अमुक नाहीं असें कोण कसें म्हणणार ?
 बरें असें तरी आहे का की, त्या परिस्थितींत सर्वच लोक दैववादी आणि निवृत्तिपर निघाले, असे असते तर एक वेळ त्या परिस्थितीचा परिणाम म्हणजे दैववाद व निवृत्तिपंथ असें वादाकरितां क्षणभर कबूल करतां आलें असतें, परंतु " सामर्थ्य आहे चळवळीचें । जो जो करील तयाचें ॥" असें म्हणणारे व "यत्न तो देव मानावा" असें सांगणारे रामदासासारखे आणि शहाजी-शिवाजीसारखे प्रयत्नमूर्ति पराक्रमी पुरुष याच कालांत झाले. संपन्नतेच्या कालांत प्रवृत्तिपंथ बळावतो हा पक्ष सिद्ध झाला तर असंपन्ना- वस्थेच्या काळांत निवृत्तिपंथ बळावतो या पक्षाला बळकटी येईल, पण तसेंहि दिसत नाहीं. ऋग्वेद काळांत 'न स स्वो दक्षो वरुण ध्रुतिः सा । सुरा मन्युर्विभीदको अचित्ति:' इत्यादि ऋचांत दैववाद दिसतो, आणि उपनिषत्कालीं तर निवृत्तिमार्गाचा उगम सांपडतो. समाजावरील दृष्टि काढून व्यक्तीकडे लक्ष दिलें तर बुद्ध हा सुसंपन्न स्थितींत असतां वैराग्याकडे झुकला आणि महमद हा संकटग्रस्त असतां उत्साहपूर्ण धर्माची स्थापना करता झाला. परिस्थिति उत्तम असतांहि कांहीं निराशावादी निघतात, दुःपरिस्थितींत वाढलेले गोल्डस्मिथ, जॉन्सनसारखे आशावादी दिसतात.

 ह्या उदाहरणांवरून असे दिसतें कीं, परिस्थितीवरून कवीच्या किंवा कोणत्याहि मनुष्याच्या मनाला अमुक वळण लागेल हें निश्चयानें सांगतां येणार नाहीं. कार्ल मार्क्स आर्थिक परिस्थितींत मानवी मनोरचनेचीं बिंगें