पान:विचार सौंदर्य.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०० 

विचार सौंदर्य


आत्मप्रतिष्ठेच्या डबक्यांत किंवा न्यूनगंडाच्या स्वभावछिद्रांत सांपडून सामान्य जनमनाला विषण्णता येण्याचा संभव आहे असें भय वाटू लागतें ! तेव्हां ह्या प्रश्नाचा थोडासा विचार करूं या. निश्चय मात्र असा केला पाहिजे कीं, सत्य कितीहि कटु, अप्रिय किंवा लोकविलक्षण वाटले तरी तें त्याज्य समजावयाचें नाहीं; पण तें लोकविलक्षण आहे आणि तें नवीन पिढीला मानवूं लागलेलें आहे, एवढ्यापासूनच तें मान्य करावयाचें अशीहि वृत्ति ठेवावयाची नाहीं.

 मी संशयवादी आहे अशी माझी कुप्रसिद्धि आहे. पण वरील प्रश्नाच्या बाबतींत माझें निश्चित मत आर्धीच सांगून टाकतों आणि तें हें की, वाङ्मयात्मक प्रतिभेचें मूळ निश्चयानें सांगतां येण्यासारखें नाहीं. सध्यांच्या अपूर्ण ज्ञानाच्या अवस्थेत तरी तें संशयात्मक राहणार. प्रतिभेचीं वर जी मुळें किंवा कारणें दिग्दर्शित केलीं तीं खरी असतील, पण त्यांतलें एकच तेवढें खरें आणि बाकीचीं खोटीं म्हणणे दुराग्रहाचें आहे. दुसरें असे कीं, अमुक व्यक्तीच्या अमुक प्रतिभाविलासाला अमुकच कारण झालें हैं म्हणण्यास समर्पक पुरावा मिळणे अशक्यप्राय आहे. कामवासना, आर्थिक परिस्थिति, बगैरेंचा परिणाम प्रतिभेवर होतो असें म्हणतांना त्या त्या व्यक्तीच्या जाणीवयुक्त मनावर त्याचा परिणाम होतो असे आमचें म्हणणे नसून हा परिणाम अबोधपूर्व होतो, तो नेणिवेच्या अंतःकरणगुहेंत होतो, असें आमचें म्हणणे आहे, असें कांही लोक म्हणतात. पण ह्या म्हणण्यामुळे प्रश्नाचा निर्णय या बाजूनें किंवा त्या बाजूनें देणें कठीण होतें. कारण बोलून चालून जें अज्ञात, अबोधपूर्व, जें जें नेणिवेंतल्या अंधारांतलें, त्याबद्दल नकारात्मक किंवा होकारात्मक विधान करावयाचें कसें ? मनोगाहनवाद्यांनीं नेणिवेंतल्या गुहेंतील तत्त्वेंहि उजेडांत आणण्याचे मार्ग काढलेले आहेत हैं मला माहीत आहे. पण विशिष्ट प्रतिभावान् व्यक्तींच्या बाबतींत विशेषें- करून कालिदास, तुकाराम वगैरे भूतकालीन व्यक्तींच्या बाबतींत त्यांच्या या पद्धति कशा लागू पडणार ? आणि जिवंत व्यक्तींच्या बाबतींत देखील मनोगाहनशास्त्रज्ञ (Psycho-analyst) स्वतःच असें म्हणतात कीं, रोज एक तास याप्रमाणें वर्षभर मनोगाहन केले तरच मनांतील गूढ भावनांचा पत्ता लागतो आणि अशा प्रकारचें मनोगाहंन किती वाङ्मयभक्तांच्या बाबतींत झाले आहे ?