पान:विचार सौंदर्य.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मय, कालनिष्ठ कीं व्यक्तिनिष्ठ

वाङ्मय हें व्यक्तीच्या प्रतिभेला अनुसरून निर्माण होणारें आहे का तें परिस्थितीला चालना आणि वळण देणारें आहे असा एक वाद अलीकडे डोकावूं लागला आहे. तत्त्वतः हा वाद जुनाच आहे. स्वरूप, क्षेत्र आणि भाषा मात्र भिन्न आहेत. महाभारतांत 'कालो वा कारणं राजा राजा वा कालकारणम् । इति ते संशयो मा भूत राजा कालस्य कारणम् ॥' असें म्हटले आहे. कार्लाईल हा 'हीरो अॅण्ड हीरोवर्शिप' या ग्रंथामध्यें ह्या प्रश्नांचा विचार करून व्यासाप्रमाणे राजाला, प्रतिभावान् व्यक्तीला, कर्तृत्वाचा मान अर्पण करून काल किंवा परिस्थिति यांना गौणस्थान देतो. बकल वगैरे भौतिकवादाकडे झुकणारे लोक काल किंवा परिस्थिति हीच त्या कालाला अनुरूप अशा व्यक्तींना जन्म देते असे म्हणतात. डार्विनच्या विकासवादानें व हेगेलच्या विरोध-विकासवादानें आपल्या परीनें कालचक्राच्या गतिमत्त्वाला महत्त्व दिले आणि कार्ल मार्क्स ह्यानें तर आर्थिक कारणामुळे केवळ राजकीय कलहच किंवा केवळ वर्गकलहच नव्हेत, तर धर्मविषयक व नीतिविषयक भावना व चालीरीतीहि रूढ होतात असे प्रतिपादिलें; इतकेच नव्हे तर काव्यादिकांच्या विशिष्ट स्वरूपाचा उगम तत्त्वदृष्टया प्रतिभावान् लोकांच्या प्रतिभेंत नसून तत्कालीन परिस्थितींत तो गूढ असतो असें त्यानें सुचविलें. त्याच्या या तत्त्वाचा भाई लालजी पेंडसे यांच्या एका पुस्तकांत अनुवाद केला आहे. फ्रॉईड, अॅडलर इत्यादि मनोगाहनवादि नेणिवेतील (unconscious) सुप्त गुप्त कामवासना, काल्पनिक इच्छापूर्ति (wish-fulfilment), आत्मप्रतिष्ठा, न्यूनगंड वगैरेमध्यें वाङ्मयाचें मूळ पाहू लागतात आणि त्यांचे ग्रंथ वाचले म्हणजे नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये म्हणतात, त्याचप्रमाणें काव्यादिकांचें पाहूं नये, कारण काव्यकुसुमांचें मूळ काव्यपंकांत,