पान:विचारसौंदर्य.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
म हा का व्ये

पूर्वी अज्ञात कारणाला जेथे 'देव' म्हणत किंवा 'दैव'म्हणत, तेथें अलीकडेहे शब्द मागे पडत जाऊन त्यांचेऐवजी ' परिस्थिति' हा शब्द वापरण्यात येतो. कित्येक वेळां ' परिस्थिति' हे कारण असते खरे, पण कित्येक वेळां या शब्दाने ज्ञानाचा केवळ आभास उत्पन्न होतो व कित्येक वेळां तर 'परिस्थिति' हे कारण नसून उलट कार्य असते ! बीज आधी की फळ आधी या वादाप्रमाणे या वादाची बहुधा स्थिति असते.
 हा वाद वाङ्मयक्षेत्रांतच नव्हे तर आधिभौतिक शास्त्रांत, राजकारणात, समाज- कारणांत व इतरत्रहि दिसून येतो. आधिभौतिक शास्त्रांत प्राणिवर्गाचा विकास कसा झाला याची उपपत्ति लावतांना लामाकं (Larnarck) व डार्विन यांच्या ( सामान्यतः प्रतिपादण्यात येणाऱ्या) 'परिस्थितिवादी मताविरुद्ध Vitalism, Creative Evolution वगैरे तत्त्वे प्रतिपादण्यांत येतात. राजकारणांत, इतिहास- शास्त्रांत, समाजकारणांत महाभारतांत म्हटल्याप्रमाणे 'कालो.वा कारणं राज्ञः राजा वा कालंकारणम्' हा प्रश्न निरनिराळ्या स्वरूपांत दृष्टोत्पत्तीस येतो व त्याचे उत्तर 'राजा कालस्य कारणम्' असें, किंवा 'कालोऽस्ति कारणं राज्ञः' असे निरनिराळ्या लोकांकडून देण्यात येते. असला कठीण, व्यापक व गुंतागुंतीचा प्रश्न एकदोन पृष्ठांत आवरणे अशक्य आहे. तथापि अर्धवट सूत्रात्मक पद्धतीने माझ्या मताचे दिग्दर्शन वाङ्मयक्षेत्रांतील उदाहरणे घेऊन करता येईल.
 महाराष्ट्रातील संतवाङ्मयांत जी निवृत्ति दिसून येते तिला परिस्थिति कितपत कारणीभूत झाली हाच एक मर्यादित प्रश्न हाती घेतला तर माझे म्हणणे थोडक्यांत सुचविता येईल. 'काव्य आणि काव्योदय' या पुस्तकांत प्रो. वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी असे प्रतिपादन केले आहे की राजकीय दुःस्थितीमुळे हा निराशा- वाद उत्पन्न झाला. पण कै. वि. का. राजवाडे यांचे मत कवींच्या निराशा-वादा- मुळे राजकीय दुःस्थिति आली असे एके काळी होते ! शिवाजीच्या आधीचा काळ जुलभाचा व अंदाधुंदीचा होता म्हणून रामदास उत्पन्न झाले व शिवाजीहि या परिस्थितीमुळेच उत्पन्न झाला व कार्य करूं शकला असे काही म्हणतात, तर यांच्या उलट शिवाजी व रामदास या दोघांनी ( सहकारितेने म्हणा किंवा स्वतंत्र- तेने म्हणा) काळाचा ओघ बदलला व नवीन काल निर्माण केला असे काहीजण