पान:विचारसौंदर्य.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

हपूस अंब्यापासून आनंद का होतो तर जिव्हेचे हपूस अंब्याच्या रसाशी तादात्म्य होते हे म्हणणे खरे आहे; ( कारण जिभेला रस लागल्याशिवाय चव कशी कळणार ?) पण हपूसचा स्वाद, गोडी, तंतुरहितत्व इत्यादि गुणांचा उल्लेख न करतां सविकल्प जिल्हा-तादात्म्य हे आम्नरसानंदाचे कारण सांगितले तर ते जितके खरें आहे व सदोषहि आहे तितकेंच सविकल्प समाधीचे काव्यानन्दविषयक तत्त्व खरें व सदोषहि आहे.
  आतां कोणी म्हणेल की, " तादात्म्य तेथे असतेच ना, आणि या तादात्म्यांत तुम्ही म्हणतां त्या सर्व अनुभवांचा अंतर्भाव होत नाही काय?" तर यावर असें उत्तर की, काव्यानन्दाचे कारण सांगतांना 'काव्यानन्द होईल अशा प्रकारच्या सर्व अनुभवांशी तादात्म्य किंवा समाधि' असें जर उत्तर दिले तर ते खरे आहे. पण अश्व म्हणजे घोडा' किंवा 'अफूपासून झोप कां येते तर त्यांत झोप आणण्याचा गुण आहे' अशा प्रकारचे हे शब्द-प्रतिशब्द-सत्य किंवा द्विशक्तिसत्य आहे, त्यांत नवीन काहीच नाही. आता वरील कारणांतील तादात्म्याला सविकल्प हैं विशेषण जर लावले तर मात्र त्यांत काही विशेष सांगितल्यासारखं होईल आणि हा विशेषच केळकरांच्या उपपत्तीचा सत्यांश रूपाने राहील. बाकी 'समाधि' ही एखाद्या किरकोळ संन्याश्याच्या समाधीप्रमाणे नाममात्रेकरूनच पूज्य राहील !
  हास्यरसाची केळकरांनी जी मीमांसा केली आहे तिचा आतां विचार करू या. ही मीमांसा वर थोडीबहुत आलीच आहे, व ती ज्या पुस्तकांत केळकरांनी केली आहे त्या 'सुभाषित व विनोद' या पुस्तकाचेहि उल्लेख आलेलेच आहेत. हे पुस्तक हरत-हेच्या कोट्यांच्या, सुभाषितांच्या, विनोदी वचनांच्या उदाहरणांनी भरलेले आहे; अर्थात् ते अनेकांच्या आनंदास कारणीभूत झालेले आहे. पण हा त्याचा विशेष नव्हे. त्यांत हास्यरसाबद्दल जी अनेक दृष्टींनी चर्चा केलेली आहे ती फार महत्त्वाची आहे. तीत केळकरांचे बहुश्रुतपणा, मार्मिकपणा वगैरे गुण दिसून येतात. भाषेचे मात्र सौंदर्य जितकें दिसावे तितके दिसत नाही. ( अर्थात् केळकरांनी तदनंतर लिहिलेल्या लेखांत व पुस्तकांत जितके दिसते त्या मानाने येथे दिसत नाही असे म्हणावयाचे आहे,—इतर अनेक लेखकांच्या मानाने ते कितीतरी पटीने येथे दिसते.) नवशिके लेखक म्हणून म्हणा किंवा विचारांची एक सुंदरशी घडी त्यावेळी बसलेली नव्हती म्हणून म्हणा किंवा

४०