पान:विचारसौंदर्य.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

वर उल्लेखिलेल्या निर्वचनीय व अनिर्वचनीय अशा उभयविध काव्यानंदकारणांचा उल्लेख न करता केवळ सविकल्प समाधीचाच उल्लेख करणे हे मला सदोष वाटते. कारण या उपपत्तींत एका आवश्यक अंगाचा जरी उल्लेख केलेला असला तरी दुसऱ्या व अधिक महत्त्वाच्या अंगांकडे दुर्लक्ष केले गेले आहे. काव्यानंदात्मक जो अलौकिक अनुभव आहे तो संमिश्रस्वरूपाचा आहे. त्यांत 'स्व'चे ज्ञान असते, 'स्व' पूर्णपणे लुप्त होत नाही, हे केळकरांनी दाखविले आहे, ते बरोबरच आहे. त्याचप्रमाणे त्यांत आपली भूमिकान सोडतां दुसऱ्या व्यक्तीशी तादात्म्य होते किंवा दुसऱ्या अनेक वस्तूंचे आकलन होते आणि हे तादात्म्य किंवा आकलन जितकें व्यक्ती समावेशक किंवा वस्तु समावेशक होईल तितका काव्यानंद अधिक, हैहि मान्य करण्यासारखे आहे. काव्यानंदानुभवांत वर दर्शविल्याप्रमाणे इन्द्रिय- सुखास्वाद, आत्माभिमानाचा उत्कर्ष, आत्मसामर्थ्यप्रतीति, परसामर्थ्यप्रतीतीमुळे उत्पन्न होणारे आदरयुक्त कौतुक, साहचर्यनियमांमुळे उत्पन्न होणाऱ्या बोधपूर्व किंवा अबोधपूर्व सुखकर आठवणी, सामान्यतः ध्यानांत न येणारे अशा वस्तुनिष्ठ किंवा प्रसंगनिष्ठ गूढ किंवा गहन सत्याचे, सौंदर्याचे, श्रीमत्त्वाचे, ऊर्जितत्त्वाचे, उदात्तत्वाचे वगैरे ज्ञान होऊन ते पटल्यामुळे मनाला येणारी सात्विक प्रसन्नता, इत्यादि अनेक गुंतागुंतीचे धागे म्हणा, पापुद्रे म्हणा, किंवा अंगें म्हणा, असून केवळ स्वप्रतीतिपूर्वक परव्यक्तीशी तादात्म्य एवढयासच महत्त्व देणे हे गैरसमज उत्पन्न करणारे आहे, म्हणून मी त्याला विरोध करतो.
  विरोध करण्याचे आणखी एक व अधिक महत्त्वाचे कारण असे की, आपण कित्येक वेळी काव्यांतील, नाटकांतील वगैरे कोणत्याहि एखाद्या व्यक्तीशी किंवा सर्व व्यक्तीशी तादात्म्य पावतों असे म्हणण्यापेक्षा त्यांतील कोणत्याहि व्यक्तींशी तादात्म्य न पावतां सर्वाकडे एका विशिष्ट अशा दृष्टीने पाहत असतो असे म्हणणे वस्तुस्थितीस अधिक घरून होईल.
  उदाहरणार्थ, मुंबई विश्वविद्यालयाच्या एका परीक्षेला मी परीक्षक आहे अशी कल्पना करा व शेजारी राहाणारा एक मुलगा पास झाला आहे व हे मला ठाऊक आहे अशी कल्पना करा. त्या मुलाची मुंबईहून तार न आल्यामुळे तो रडत आहे, त्याची आई दुःखीकष्टी झालेली आहे, त्याचे शत्रु मनांत आनंद पावत आहेत, अशी आणखी कल्पना करा. परीक्षेचा निकाल ठाऊक असून हे सर्व मी निमूट-

३८