पान:विचारसौंदर्य.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचारसौंदर्य

व आत्मप्रत्ययवर्धक जाणिवेपासून आनंद होत असतो. मुसळधार पावसांत पाणकोट, व बूट वगैरे घालून ऐटीने व निर्धास्तपणे चालण्यात जो आनंद होतो तो अशाच जातीचा असतो, पण क्षुद्र क्षेत्रांत व क्षुद्र प्रमाणाचा असतो एवढेच !
  (८) शोकरसोद्भव आनंदाचा विचार करू लागल्यास आणखी अशाच उपपत्ति सांपडतील; पण त्या सर्वांचा विचार न करता सहजसौंदर्यजन्य व कलासौंदर्यजन्य आनंदामधील आणखी एका घटकाचा विचार करू या. हा घटक असा की हरतऱ्हेच्या वस्तूंत, देखाव्यांत, प्रसंगांत, वगैरे जे एखादें सत्य, सौंदर्य, रम्यत्व किंवा उदात्तत्व वास करीत असते पण जें सामान्य लोकांना कळत नाही, ते प्रतिभावान् चित्रकार, कवि, लेखक वगैरे आपापल्या कलाकृतींच्या द्वारे इतरांस प्रतीत करून देतात. थोर पुरुषांच्या आपत्तींत, शूर. योद्धयांच्या मरणांत, विधवांच्या विलापांत (होय, विलापात) जें ध्येयवादित्व जन्य रम्यत्व आहे त्याचा प्रत्यय कवींनी वगैरे आणून दिला म्हणजे आपणांस आनंद होतो. हे. कबूल करणे म्हणजे 'सविकल्पसमाधी ' मुळे आनंद होतो ही केळकरांची उपपत्ति मान्य करण्यासारखेच दिसते आणि मी विरोधाकरितांच विरोध करीत आहे असे काही लोकांना वाटेल; पण तसे नाही. जे रम्यत्व, उदात्तत्व वगैरे आपणांस सामान्यतः दिसत नाही त्याचा प्रत्यय आपली भूमिका न सोडता आपणांस आला म्हणजे काव्यानंद, कलानंद वगैरेची उपलब्धि होते असे मी म्हणत आहे. पण केळकरांच्या उपपत्तीत रम्यत्वादि गुणांना आवश्यक स्थान दिलेले नाही. मी आपली भूमिका न सोडतां मला कविसामर्थ्याने हिमालयदर्शनाचा लाभ झाला तर आनंद आहे. एखाद्या शेतखान्याचे किंवा उकिरड्याचे किंवा स्मशानाचे प्रत्यक्ष, किंवा काव्यवाचनाच्या द्वारें अप्रत्यक्ष दर्शन झाल्यामुळे आनंद होणार नाही हे उघड आहे. हां, शेतखान्याचे वगैरे वर्णन देखील एखादवेळेस आनंद देईल, जर तें रम्य असेल तर. भूमिका न सोडतां मला रम्य देखाव्याशी एका अर्थी समरस होतां आले यामुळे आनंद झाला तर त्यांत समरसत्वाचे अंग आहेच आहे, पण रम्यत्व असलेले वर्णन है आनंदाचे प्रधान कारण आहे. भूमिकेचा आधिभौतिक अयं न घेतां 'स्व'त्वाची भूमिका हा जो केळकरांचा विवक्षित अर्थ त्या अर्थाच्या दृष्टीने विचार करावयाचा म्हणजे 'स्व' त्व न गमावतां मी जर शाकुन्तलामधील कन्व किंवा रघुवंशांतील अज किंवा मुक्तेश्वराच्या महाभारतातील पांडव यांशी

३६