पान:विचारसौंदर्य.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

"रस व अलंकार यांच्या स्वरूपांत इतकाच फरक की, रसाचे स्थायिभाव जीव- सृष्टीच्या भावनांवर अधिष्ठित असतात व अलंकाराचे स्थायिभाव अचेतन सृष्टीवरहि अधिष्ठित होऊ शकतात. स्त्रीला लतेची उपमा दिली असता आनंद होण्याचे कारण हेच की, समगुण अशा दोन पदार्थाचा अनुभव एकदम घेतां येतो इत्यादि इत्यादि." केळकरांनी लतेला अचेतन म्हटले आहे ते चिन्त्य आहे, पण ते सोडून देऊन “स्थायिभाव सृष्टीवर अवलंबून असतात" या म्हणण्याचा अर्थ काय याचा विचार करूं या. [ हा विचार करतांना एक अशी गोष्ट ध्यानात येते की, केळकर हे 'भाव' हा शब्द शास्त्रीय कांटेकोरपणाने न वापरतां कित्येक वेळां ढिलेपणाने वापरतात. उदाहरणार्थ, “ सुभाषित आणि विनोद " या पुस्तकांत पृष्ठ २० मधील ३४ व्या कलमांत "अंतःकरणाची जी सहज व स्वाभाविक वृत्ति तिला भाव असे म्हणतात" असे सांगून लगेच २१ पृष्ठावर .“ रसानुकूलविकृतिभावः " अंशीहि एक व्याख्या देतात व त्यांची एकवाक्यता किंवा तथ्यातथ्यता दाखविण्याचा प्रयत्न करीत नाहीत. पृष्ठ २२ वर “ सात्त्विक भाव म्हणजे सुखदुःखादि भावांनी भावित असे अंतःकरण त्यापासून उत्पन्न होणारे जे भाव ते" असे त्यांनी म्हटलेले आहे व 'भाव' शब्दाच्या अर्थाबद्दल अधिकच संशय उत्पन्न केलेला आहे ! हा प्रश्न बाजूला ठेवून स्थायिभाव सचेतन सृष्टीवर व अचेतन सृष्टीवर अधिष्ठित असण्यावर रस व अलंकार यांमधील भेद ठरविणे कितपत योग्य आहे हे पाहण्याचा प्रयत्न करू या. खरे सांगावयाचे म्हणजे या बाबतीत माझें मन मला असे सांगते की, केळकरांचा अर्थ मला चांगला समजला नसावा, किंवा त्यांच्या लेखनांत ढिलेपणा असावा. कारण रस हे अंतःकरणाची अवस्था सुचवितात व 'अलंकार' हे काही अंतःकरणाची अवस्था सुचवीत नाहीत, ही शाब्दिक शंका सोडून दिली तरी अलंकारांपासून उत्पन्न होणारी अवस्था व रस या संज्ञेनें सूचित होणारी मनोऽवस्था ( किंवा वाटल्यास तजनक वाक्प्रबंध ) यांतील भेद अचेतन व सचे- तनत्वावर अवलंबून कसा आहे हे कळणे कठीण आहे. कारण निर्जन अरण्य किंवा श्मशान यांच्या सरस वर्णनाने रसोत्पत्ति होऊ शकते व उलटपक्षी सचेतनाला सचे- तनाची उपमा दिली (उदाहरणार्थ, विष्णुशास्त्री यांना मराठी भाषेच्या बाबतीत शिवाजीची उपमा दिली किंवा टिळकांना रामदासाची उपमा दिली) तरी सचेत- नत्वामुळे अलंकार उत्पन्न होत नाही असेंहि नाही. 'अलंकाराचे स्थायिभाव अचेतन

३२