पान:विचारसौंदर्य.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

देखील आनंद होतो असा अनुभव आहे. इतके दिवस अज्ञात असलेल्या गोष्टीचे आकलन झाले या जाणिवेनें जो आनंद होतो तो विद्यानंदाचा एक घटक आहे यांत शंका नाही. कलाजन्य आनंदांत देखील हा एक घटक आहे हेहि कबूल करण्यास हरकत नाही. पण हा घटक अगदी गौण आहे आणि कलानंदाचा तो व्यवच्छेदक विशेष नव्हे.
 आपली भूमिका न सोडतां दुसऱ्या भूमिकेशी समरसत्व होणे शक्य आहे व यांत आतां वर म्हटल्याप्रमाणे एक प्रकारचा आनंद आहे, हे कबूल केले तरी कलानंद किंवा काव्यानंद सविकल्प समाधीपासून उत्पन्न होतो या उपपत्तीवर अनेक आक्षेप घेता येण्यासारखे आहेत. केळकरांनी कण्वाचे व शकुंतलेचे उदा- हरण घेऊन आपली भूमिका न सोडतां आपण कण्वाशी किंवा शकुंतलेशी समरसता पावतो म्हणून आनंद होतो असे म्हटले आहे; आता मला असा प्रश्न पडतो की, एखाद्या गाईचे व तिच्या वासराचे सुंदर दृश्य पाहून किंवा रंगविलेलें रंगेल चित्र पाहून किंवा रेखाटलेले शब्दचित्र वाचून मला जो आनंद होतो तो गाईशी तादात्म्य पावून का वासराशी ? याच्याहून दुसरा व अधिक कठिण प्रश्न असा की, एखादे वेळेस प्रातःकाळी टेकडीवरून नदीकाठचा रम्य देखावा पाहून मी आनंदित होतो तो नदीशी तादात्म्य पाहून, का झाडाशी, का टेंकडीशी, का आभाळांतील अनेक- रंगी ढगांशी ? येथे कोणी उत्तर देईल की, आपण सृष्टिकर्त्याशी क्षणैक तादात्म्य पावतो व त्याचे अंतरंग जणू काही आपणांला क्षणभर कळून त्याचे वैभव आणि कौशल्य पाहून आपण आनंदित होतो. त्याचप्रमाणे वरील गाईच्या व वासराच्या, तसेंच तैलचित्राच्या व शब्दचित्राच्या उदाहरणांत आपण चित्रकाराशी व कवीशी तद्रूप होतो आणि आपली भूमिका तर सोडीत नाही म्हणून आनंद होतो; असे उत्तर देतां येण्यासारखे आहे; पण हे उत्तर केळकरांच्या उदाहरणांवरून तरी त्यांना विवक्षित आहे असे दिसत नाही. कारण त्यांच्या उदाहरणांत कण्व, अंज, पांडव इत्यादि पानांशी आपण तादात्म्य पावतो असे म्हटले आहे; हे प्रसंग वर्णन करणाऱ्या कालिदास व मुक्तेश्वर कवीशी तादात्म्य पावतो असे म्हटलेले नाही.
 अचेतन सृष्टीशी तादात्म्य कसे पावावयाचे हा प्रश्न केळकरांनी रस व अलंकार यांतील त्यांनी जो भेद दाखविला तो दाखवितांना उत्पन्न झाल्यासारखा दिसतो, पण त्याचे महत्त्व पुरतेपणी त्यांच्या ध्यानात आल्यासारखे दिसत नाही. ते म्हणतात.

३१