पान:विचारसौंदर्य.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

अर्थात् सविकल्प समाधीची उपपत्ति मला किंवा इतरांना काही बाबतीत पसंत पडत नाही यांत आश्चर्य नाही. माझा मतभेद थोडक्यांत व विरोधाभासात्मक शब्दांत सांगावयाचा म्हणजे मी असें म्हणेन की, केळकरांच्या सविकल्पत्वाला मनांत कोणताहि विकल्प न ठेवतां मी मान्यता देतो, पण त्यांच्या उपपत्तींतील ' समाधी- पासून आनंद होतो' या म्हणण्याला जलसमाधि देऊ इच्छितों! काव्य करतांना कवि, किंवा काव्यरसास्वाद घेतांना रसिक, हा विषयाशी पूर्ण तादात्म्य पावत नाही, तर त्याची समाधि सविकल्प असते, हे मला पूर्णपणे मान्य आहे. कवीने, वक्त्याने, कलाकुशलाने, रसिकाने स्वतःला विसरावयाचे खरे, पण पूर्णपणे विसरावयाचे नाही. नैतिक क्षेत्रांत जसे स्वार्थ विसरणे हे ध्येय आहे, पण उच्च अर्थाचा जो 'स्व' त्याचा अर्थ विसरावयाचा नाही, तर उलट 'आत्मज्ञान' करून घेऊन 'आत्मप्राप्ति' ध्येय असते, त्याप्रमाणेच रसास्वादाचे बाबतीत देखील रसिकार्ने एका अर्थी स्वतःला विसरावयाचे आहे व एका अर्थी एक विशिष्ट व ब्रह्मानंदतुल्य अलौकिक आनंद देणान्या स्वानुभवाचा उत्कर्ष साधावयांचा आहे. काव्यात्मक आनंदांत समरसत्व असते, तादात्म्य असते, पण हे वाच्यार्थाने घ्यावयाचे नसते तर ते 'अलौकिक' असते आणि त्यांत सविकल्पत्व असते हा मुद्दा जितका लोकांच्या ध्यानात यावा तितका येत नाही.
 शोकरसाचा आनंद घेतांना पूर्ण तादात्म्य पावल्यास आपणांस शोक होईल; शोकरसाचा आनंद होणार नाही. शोकगंभीर नाटकांमध्ये ( Tragedies मध्ये) आनंद होतो तो तन्मयता अपूर्ण असते म्हणून होऊ शकतो, पूर्ण तन्मयता झाल्यास शोकरस उत्पन्न न होतां शोक उत्पन्न व्हावयाचा. 'एकच प्याल्यां'- तील 'सिंधू' चे वगैरे बालगंधर्वोचें शोकरसोत्पादक नाट्य पाहतांना काही अडाणी बाया शोकप्रचुर देखावे सह्य न झाल्यामुळे नाटकगृह सोडून जातात मी ऐकले आहे. मला देखील या बायांप्रमाणे रडू येते, पण मी बराच समरस झालों तरी स्वतःची वा. म. जोशी ही भूमिका ( व खुर्ची) सोडीत नाही. आणि म्हणून मला रसास्वाद घेता येतो!
 समरसत्वाकडे प्रवृत्ति किंवा गति आहे, जितके त्याच्या जवळ जातां येईल तेवढे जावयाचे, अगदी जवळ जाण्याची कमाल किंवा पराकाष्ठा करावयाची, पण स्पर्श मात्र करावयाचा नाही, असा हा प्रकार आहे आणि त्याला जराशी कठिण

२९