पान:विचारसौंदर्य.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

या आनंदाने एक प्रकारची तल्लीनता येते व तो आनंद फारच उत्कट झाला तर त्यापासून समाधान लाभू शकेल. या दृष्टीने पाहतां 'खरी सविकल्प समाधि उत्पन्न करूं शकतें तें वाङ्मय' अशी नवीन व्याख्या मी बनविली आहे."
 ही उपपत्ति मला मान्य नसली तरी तिने मराठी साहित्यचर्चात्मक विचारांत चांगली भर घातली आहे व विचारांना चालना दिली आहे हे मी आनंदाने कबूल करतो. पूर्वी कवीची किंवा रसिकाची स्तुति करावयाची झाली म्हणजे विषयाशी तादात्म्य पावण्याची भाषा आपण ऐकत होतो. कवि विषयाशी तद्रूप होतो व त्याच्या भावना अनावर झाल्यामुळे कारंजाच्या फवाऱ्यांप्रमाणे त्या काव्यरूपाने बाहेर पडतात अशी भाषा पूर्वी ऐकू यावयाची ( व अजूनहि येतेच आहे ! ) Poetry is the spontaneous overflow. of powerful feelings हैं वॉर्डस्वथरचे वाक्यहि अशा संदर्भात कानांवर आदळावयाचेच. पण काव्य करतांना कवि मूलभूत भावनांना पूर्णपणे वश झालेला नसतो तर तो शान्त झाल्यावर पुनः स्मृतीच्या व कल्पनेच्या साहाय्याने पूर्वीच्या भावनांना एक प्रकारे जागृत करीत असतो व अशा छायात्मक भावनांचा क्षोभ एक प्रकारच्या मनःशान्तीच्या अधिष्ठानावर होऊन त्या शान्ति- सागरांत छायात्मक भावनांचा कल्लोळ उत्पन्न झाल्यावर काव्यप्रसव होतो असें वर्ड्सवर्थचे खरे म्हणणे होते ते कानांवर सहसा येत नाही. योगांतील समाधि व हे कलाविषयक तादात्म्य यांतील साम्यामुळे या कलाविषयक तादात्म्याला समाधि- 'विषयक पूज्यभावाचा फायदा मिळून ते कलाविषयक टीकावाङ्मयांत वेदवाक्या- प्रमाणे सादर स्वीकरणीय ठरले. पण केळकरांची उपपत्ति प्रत्यक्षतः रसिकांच्या मनःस्थितीसंबंधी असली व कवीच्या मनःस्थितीचा विचार त्यांत अप्रत्यक्ष असला तरी या दोन मनःस्थितींचा अत्यन्त जिव्हाळ्याचा संबंध असल्यामुळे सविकल्प समाधीच्या उपपत्तीमुळे तादात्म्याची चुकीची उपपत्ति मागे पडली आहे, ही चांगली गोष्ट झाली. काव्यानंद हा विशिष्ट प्रकारचा आनंद आहे आणि त्याचे पृथक्करण करून त्याचे स्वरूपवर्णन करणे व कारणमीमांसा करणे हे तत्त्वदृष्टया जरूरीचे आहे व वाङ्मयदृष्टया मनोरंजक आहे हे केळकरांनी या प्रश्नाला आपल्या अध्यक्षीय भाषणात महत्त्व देऊन लोकांच्या नजरेस आणले आणि या प्रश्नाकडे रसिकांचे लक्ष वेधले हा मराठी वाङ्मयाचा मोठाच फायदा झाला आहे.
 आतां कोणतीहि उपपत्ति निघाली म्हणजे ती सर्वांनाच पसंत पडेल असे नाही.

२८