पान:विचारसौंदर्य.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

प्रथम विदग्धसभेपुढे मांडिली ती त्यांच्याच शब्दांत सांगून त्यांतील गुणदोषांकडे मागून वळतो. केळकर म्हणतात.
 "आपली तर भूमिका सोडावयाची नाही, पण बसल्या बैठकीत इतर भूमिकांचाहि अनुभवानंद सेवावयाचा, ही गोष्ट प्रतिभाच घडवू शकते. आपण नवरसांचेच उदाहरण घेऊ. रसपूर्ण असे काव्य वाचताना जो आनंद होतो तो आत्मौपम्य बुद्धीमुळेच. कोणत्याहि रसाचा स्थायिभाव क्षणभर दुसऱ्याचा घेऊन आपलासा केल्याशिवाय रस-प्रतीति होत नाही. प्रत्यक्ष आपली मुलगी सासरी चालली असतां डोळ्यांतून पाणी गाळीत जे शब्द आपण बोलतों ते आपणांला काव्य नव्हे. तो आत्मभूमिकेवरचा एकेरी अनुभव. पण तेच शाकुन्तलाच्या चौथ्या अंकांतील कण्वावरचा कन्याविरह-प्रसंग वाचीत असतां डोळ्यांतून पाणी गाळीत जे शब्द. आपण वाचतो ते मात्र आपणांला काव्य किंवा वाङ्मय. कारण, येथे एका ऐवर्जी दोन भूमिका होतात. वाचक आपली भूमिका न सोडतां मनाने दुसऱ्या भूमिकेवर संक्रमण करतो व प्रतिभेने अनुभव घेतो म्हणून ते दुःख नसून रसास्वादाचा. आनंद होय."
 या विवेचनानंतर केळकरांनी रघुवंशांतील व मुक्तेश्वराच्या भारतांतील उदाहरणे देऊन आपले म्हणणे विशद केले आहे आणि अखेरीस रसांप्रमाणेच अलंकारांना आपल्या सविकल्प समाधीच्या उपपत्तीच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्न केला आहे. हा त्यांचा प्रयत्न मला थोडासा अयशस्वी वाटतो. पण मतभेद दर्शविण्यापूर्वी त्यांचे म्हणणे त्यांच्याच शब्दांत सांगतो. ते म्हणतात." बहुतेक अलंकार हे उपमा व रूपक यांच्या निरनिराळ्या परीच आहेत. उपमा व रूपक या दोहोंत पूर्ण किंवा ईषत्-तादात्म्य असा फरक असला तरी एकरूपता-- प्रतिपादन हाच दोहोंचा मुख्य उपयोग आहे. या तादात्म्याने तरी आनंद का होतो. असे विचारले तर त्याचेंहि उत्तर रसाविषयी दिले तेच होय. रस व अलंकार यांच्या स्वरूपांत वास्तविक फरक इतकाच की रसाचे स्थायिभाव जीवसृष्टीच्या भावनांवर अधिष्ठित असतात व अलंकाराचे स्थायिभाव अचेतन सृष्टीवरहि अधिष्ठित होऊ शकतात. स्त्रीला लतेची उपमा दिली असतां आनंद होण्याचे कारण हैं की समगुण अशा दोन पदार्थाचा अनुभव मनाला एकदम घेतां येतो व हीच गोष्ट समगुण अशा जितक्या अधिक पदार्थोविषयीं एकदम घडेल तितका आनंद वाटेल.

२७