पान:विचारसौंदर्य.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

नये हे खरे असेल, पण तिने ' मनःपूत' वागावे व नीतीचा खून करावा (किंवा इतकी कडक भाषा नको असल्यास) तिनें औचित्यभंग करावा असा मात्र याचा अर्थ नव्हे. औचित्य सर्वांनीच पाळले पाहिजे. अश्लील व श्लील याबद्दल वसन्त- व्याख्यानमालेत बोलतांना हे केळकरांनी सुंदर रीतीने सुस्पष्ट केले होते. चारचौघांत जें वाङ्मय वाचण्यास संकोच वाटेल किंवा जे चित्र पाहण्यास अवघड वाटेल तें अनुचित. आतां संकोच वगैरे जे काही आहे तो सगळा संवईचा भाग आहे असे काही लोक म्हणतील. लोकांच्या मनाची, संवईमुळे का होईना, विशिष्ट मनोघटना झाली. असेल तर ही घटना कायम आहे तोपर्यंत त्यांना वाटणारे अनौचित्य टाळलेले बरे. काव्याकडे काव्यदृष्टीनेच पाहावे असे केळकर म्हणतात त्या वेळेस नैतिक अनौचि- त्याकडे दुर्लक्ष करावे असा त्यांचा भावार्थ नाही. काव्यात्मक कलेने व इतर कलांनी मनाची लाज नसली तरी जनाची लाज ठेवावी असेंच ते म्हणतील. आतां नीति- अनीतिविषयक विचारसरणी व मूलभूत सिद्धान्त यांविषयींच जर पूर्ण मतभेद असेल तर काय करावयाचे याचा विचार केळकरांनी कोठे केलेला दिसत नाही. पण त्यांच्या लेखांचे एकंदरीत धोरण असे दिसते की, नीतीने नाकाने कांदे सोलूं नयेत व कलेने नीतीला कोपऱ्यांत बसवू नये. कलाविषयांत नीतीनें लुडबूड करूं नये हे खरे असले तरी अनीतीची दुर्गधि आपल्या क्षेत्रांत येणार नाही अशी काळजी कलेने घेणे हे औचित्याला धरून नाही काय, असें केळकर विचारतील. 'कुळकर्णी- लीलामृता ' सारख्या पुस्तकांतील किंवा प्रभाकरादिकांच्या लावण्यांतील सौंदर्य त्यांना समजते. पण पहिले सौंदर्य असत्याने शवलित व दुसरें नैतिक अनौचित्याने दूषित, म्हणून ती शुद्ध आनंद देऊ शकत नाहीत असे ते म्हणतील. रघुवंशांत अजराजाच्या सुराज्य-व्यवस्थेचे श्रृंगारिक भाषेत जें वर्णन केले आहे त्याचा रसास्वाद ते घेऊ शकतात, पण तें सदोष आहे हे ते ओळखून असतात. रसास्वाद किंवा कलाविशिष्ट आनंद हाच हेतु किंवा हेच फळ म्हटले तरी हा रस किंवा हा आनंद 'शुद्ध'व औचित्ययुक्त असलाच पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. परिपूर्ण व ध्येयात्मक आनंदाच्या दृष्टीने तरी त्यांचे हे म्हणणे मान्य करण्याशिवाय कोणालाहि गत्यन्तर नाही.
 आतां सुंदर वाङ्मयापासून मनाला आनंद का व कसा होतो याविषयी केळ- करांनी जी ' सविकल्प समाधीची ' उपपत्ति बडोदें येथील अध्यक्षीय व्याख्यानांत

२६