पान:विचारसौंदर्य.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

त्यांना सुचतान डेहि कबूल सम्मादिकांचे बंधन असते म्हणूनच काही वेळां कवींना वगैरे डोके खाजवावे लागते, व त्यांच्या कल्पनाविलासाच्या व बुद्धिविलासाच्या साम- र्थ्याला चालना मिळते, त्यांची स्वतःची व वाचकादिकांची तद्विषयक हौस पुरवली जाते आणि उभयतांना सात्त्विक काव्यानंदाचा लाभ होतो हे सर्व मला मान्य आहे. काव्य म्हटले म्हणजे ते भावनाविलासात्मकच पाहिजे असा माझा आग्रह नाहीं; बुद्धिविलास व कल्पनाविलास यांचे मला इतरांप्रमाणेच कौतुक वाटते आणि तज्जन्य आनंद लुटतांना मला कमीपणा किंवा लाज वाटत नाही. शाब्दिक कोट्यांचा देखील मी भोक्ता आहे, मग त्याहून उच्चतर असलेल्या अलंकारादिकांनी माझें मन प्रफुल्लित होते हैं कबूल करण्याची जरूर नाही. कल्पनावैभव, शब्दप्रभुत्व इत्यादिकांनी उत्पन्न झालेली आश्चर्य चकितता, कौतुक, इत्यादींनी विशिष्ट अशी एक संमिश्र भावना असते व भावना ही सात्त्विक आणि उच्च स्वरूपाची असू शकते असे केळकरांनी जें मार्मिकपणे दाखविले आहे ते सर्व यथार्थ आहे. कोणत्याहि बौद्धिक व्यापाराशेजारी तद्विशिष्ट भावना नियमाने असतेच हे मानसशास्त्रीय तत्त्व या संदर्भात ध्यानात धरावे. सर्वच काव्ये भावनाविलासात्मक असतात असे या अर्थाने म्हणता येईल; पण अशांचे प्राधान्य पाहून नांवे ठरविली तर सामान्यतः ज्यांना भावनाविलासात्मक काय म्हणतात त्यांतील उच्चतम काव्यांना यमके, अलंकार, इत्यादींची आवश्यकता नाही, ती अंगभूत नाहीत, तर अनुषंगानें, गौणरीतीने व अनियमपूर्वक येणारी आहेत असे मला म्हणावयाचे आहे. अलंकारादिकांच्या विरुद्ध लिहिणारे लॉक ( Locke) प्रभृति लोक देखील अलंकारांचा उपयोग कर- तात असे केळकर म्हणतात. यावरून एवढेच सिद्ध होईल की, त्यांचा उपयोग करणे मनुष्यमात्रास आवडते, त्यांची योग्यता उच्चतम आहे. हे असल्या उदाहर- णांनी सिद्ध होत नाही, किंवा उच्चतम वाङ्मयाला ती आवश्यक असतात हेहि सिद्ध होत नाही. शुद्ध व उच्चतम विनोद शब्दनिष्ठ किंवा कल्पनाविलासात्मक नसतो किंवा बुद्धिविलासात्मक नसतो, तर तो प्रसंगनिष्ठ असतो असे अलीकडे म्हणूं लागले आहेत तेच शोक-शृंगार वगैरे रसांसंबंधानेंहि म्हणता येईल. हिंगणे येथील शाळेतील एका आठ दहा वर्षाच्या मुलीला कुंकू न लावतां फिरल्याबद्दल मी रागावू लागली असतां " तात्या, मला कुंकू लावायचं नसतं " असे ती अजाण बालिका जणू काही आपण म्हणतो त्यांत कांहींच नाही अशाच भासणाऱ्या स्वरांत

२२