पान:विचारसौंदर्य.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

होय व राजतरंगिणी पद्यमय असली तरी ते गद्यच होय. इंग्रजीतहि कार्लाइल व इमर्सन यांचे लेख गद्यरूप असले तरी ते काव्यच होय व वर्ड्सवर्थ यांची कविता पद्यरूप असली तरी ते गद्यच होय." माझ्या मते गद्य-पद्यांची बाह्यलक्षणावलंबी भाषा सोडून द्यावी. बोधप्रधान व रसप्रधान असे दोन प्रकार मानावेत व 'गद्य' आणि 'काव्य' असा भेद न करितां ' शास्त्रीय वाङ्मय ' आणि 'विदग्ध वाङ्मय' असा भेद करावा. पण केळकर म्हणतात त्याप्रमाणे " शब्दसंकेत हा, दुस्तर आहे व तो पाळलाच पाहिजे! "
  खऱ्या काव्याला छंद, यमर्के, अलंकार, वगैरेंची आवश्यकता नाही हे केळकर तत्त्वतः कबूल करतात. पण लगेच मागच्या दरवाजाने या सर्वांना ते आवश्यक अंगांच्या योग्यतेला नेऊन बसवितात. उदाहरणार्थ, " रस काव्याचा आत्मा असेल " असे अर्धवट कबूल करून लगेच ते " अलंकृत भाषा हा त्या रसरूपी आत्म्याचा निदान देह होय " असे मानण्यास ते आपणांस सांगतात. दुसऱ्या एका ठिकाणी ते म्हणतात, "अलंकार, वक्रोक्ति, व्यंग्योक्ति, हाहि काव्याचा आत्मा नव्हे असे म्हणणारे लोक संकुचित दृष्टीचे आहेत." " रसोत्कर्ष होण्याला स्वभावाक्ति पुरी पडू शकेल, पण ती नेहमीच पुरी पडते असे नाही." यमके ही आवश्यक नसतील असें कबूल करून पुनः त्यांच्या गौरवार्थ ते म्हणतात की, "यमकाने नुसता शब्दच नव्हे तर कल्पनाहि.सुचतात." त्यांचे हे सर्व म्हणणे खरें आहे आणि कान्याकाव्यामध्ये भेद करून तारतम्य ठरवले म्हणजे पुष्कळसा वाद मिटण्यासारखा आहे. भावनाविलासांप्रमाणे कल्पनाविलासांना व विचारविलासांना गौरवाचे स्थान देण्यास माझी हरकत नाही; पण तर-तम-भाव ठरवावयाचा म्हटला म्हणजे भावनाविलासांना उच्चतम स्थान द्यावे लागेल असे मला वाटते आणि भावनाविलासात्मक उच्चत्तम काव्यांचा आत्मा अलंकार नव्हे, किंवा वक्रोक्ति नव्हे किंवा व्यंग्योक्तिहि नव्हे हे म्हणणे मान्य करावे लागेल. भावनाविलासात्मक उच्चतम काव्यांचा 'देह ' म्हणून देखील अलंकारादिकांना मान्यता देण्यास मी तयार नाही. कारण ' देह ' म्हणणे म्हणजे ते आवश्यक आहेत असे मान्य करण्यासारखे आहे. तालबद्ध रचना, छंद, अनुप्रास, यमकें, अर्थालंकार, वक्रोक्ति, व्यंग्योक्ति इत्यादी- मुळे भाषणाला किंवा लेखनाला शोभा येते हे मला कबूल आहे. यांचे पुष्कळ वेळां कवींना बंधन वाटत नाही, तर स्वाभाविकपणेच असले सालंकार व मधुर वाक्प्रबंध

२१