पान:विचारसौंदर्य.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

ठिकाणी डुंबलेले व रममाण झालेले आहेत, इतकेच नव्हे तर वाङ्मयसागराच्या बुडाशी जाऊन आणि तेथे डोळे उघडून पाहून ते तळ घेऊन आलेले आहेत !
 त्यांची वाङ्मयचिकित्सा वाचनीय होण्याचे आणखी एक कारण असे की, त्यांची वाणी रसाळ आहे. साहित्यशास्त्रांतला कसलाहि रूक्ष विषय असो किंवा सूक्ष्म भेद असो, त्याचे पृथक्करण व विवेचन करतांना ते इतके रंगतात व सांगायचे ते इतके खुलवून सांगतात की, ते ऐकतांना किंवा वाचतांना मनुष्य रंगून जातो आणि एका विशिष्ट कलात्मक आनंदांत तो डोलू लागतो. शुभ्र प्रकाशकिरणाचे पृथकरण केले असतां सूक्ष्मतम पण रूक्ष तत्त्व हाती न येतां सात रंग दिसू लागतात ते त्या किरणाच्या स्वभावगुणामुळे; पण केळकरांनी सूक्ष्म तत्त्वांचे पृथक्करण केले असतां तेथे सप्तरंगात्मक जी शोभा दिसते ती मात्र यांच्या कलाकुशलतेमुळे होय !
  सौंदर्याचे पृथक्करण व विच्छेदन ( Dissection) करूं नये, कारण विच्छेदन म्हणजे विध्वंसन ( We murder to dissect ) असे वॊर्डस्वर्थ म्हणतो, आणि फुलांच्या पाकळ्या तोडून टाकणान्या मुलासारखी वृत्ति असलेल्या लोकांच्या बाब- तीत हे खरहि आहे. पण केळकरांसारख्यांचे विच्छेदन हे देवांचे शस्त्रवैद्य अश्विनी- कुमार यांच्या विच्छेदनासारखे असून त्यामुळे विध्वंसन होत नाही तर मृतकल्प झालेल्या व शब्दांत मात्र जिवंत राहिलेल्या शास्त्रीय तत्वदेहास जणू काही संजीवनी- मंत्रयुक्त हस्तस्पर्शाचा लाभ होऊन त्यांत जीवनकला उत्पन्न होते व ते नाचू- बागडूं लागते आणि आपले मन आकर्षण करून घेते. उदाहरणार्थ, काव्यादि- कांचा आस्वाद न घेता त्यांची चर्चा करणे वेडेपणाचे आहे या आक्षेपाबद्दलच त्यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की, फलाहार करतांना द्राक्षादि फलांचा वगैरे आहार हा जरी प्रमुख हेतु असला तरी त्यावेळी ही फळे कोठून आली, त्यांचे प्रकार किती, प्रत्येकाची चव काय, वगैरे गोष्टींबद्दल चर्चा केली असतां फलाहारांत अधिक मौज उत्पन्न होणार नाही काय ? काव्यानंदाचा उपभोग न घेतां शुष्क वाटणाऱ्या काव्यचर्चेबद्दल जो आक्षेप घेण्यांत आला त्याची धार या अशा उपमांमुळे लगेच बोथट होते. उपमांनी अर्थात् सगळे काम होत नाही. चांगल्या उपमा या हंड्याझुंबरांतील मेणबत्त्यांप्रमाणे लेखनमन्दिर प्रकाशित करतात किंवा सुवासिक पुष्पांप्रमाणे ते सुगन्धयुक्त करतात किंवा सनईच्या सुरांप्रमाणे गूढ आणि कोमल भावना जागृत करतात आणि श्रोत्यांची मने प्रसन्न

१९