पान:विचारसौंदर्य.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

वगैरे त्यांना समजलेले आहे व लोकाभिरुचि कशी आहे याबद्दलचे त्यांचे मत अधि- कारयुक्त समजले पाहिजे. जागजागचे नवे व जुने वक्ते, लेखक, कवि, कीर्तन- कार, शास्त्री, प्रोफेसर, इतिहाससंशोधक, चित्रकार, मूर्तिकार, गवई, बजवय्ये, वगैरे कलाविलासी किंवा शास्त्रचिकित्सक लोक त्यांना भेटत असल्यामुळे या लोकांची ध्येये, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे गुणदोष वगैरे गोष्टी त्यांना जितक्या प्रमाणांत स्वानुभवाने ठाऊक आहेत तितक्या प्रमाणांत फारच थोडयांना ठाऊक असणार. अर्थात् वाङ्मयकलेविषयी व शास्त्राविषयी नवे व जुने विचार व मनो- भाव, तसेच नवी व जुनी कृति, यांच्या नाड्या पाहून योग्य चिकित्सा व मीमांसा करण्यास यांना फारच मोठा अधिकार प्राप्त झाला आहे.
 केळकरांनी केवळ वाङ्मयात्मक कलाकृतीच निर्माण केल्या असत्या किंवा बहिर्मुख दृष्टीने लोकांच्या कलाकृतीचे परीक्षण समीक्षण केले असते, किंवा केवळ रसास्वादांत ते रममाण झाले असते, तर त्यांच्या वाङमयविषयक मीमांसेला आजचे असामान्य महत्त्व आले नसते. लेखाच्या प्रारंभीच दिग्दर्शित केल्याप्रमाणे आपण जे करतो ते कसे व का करतों, आपली जी कलाकृति आहे तिचे सामान्य स्वरूप काय, तिचे ध्येय काय, तिच्यापासून आनंद का होतो, वगैरे गोष्टींचे अंतर्निरीक्षण करण्याचे सामर्थ्य केळकरांमध्ये असल्यामुळे वरील अधिकारांत आणखी भर पडली आहे. अंतर्निरीक्षणाची कला जितकी सोपी वाटते तितकी नाही. पर-हृदया- पेक्षा स्वहृदय जाणणे सोपे आहे असे वाटते, पण ते वाटते तेवढे सोपे नाही. कविजन परकाया-प्रवेश करतात, व सजन लोक पर-हृदय जाणतात, पण स्वहृदय- प्रवेश करण्यास जी अंतर्मुख-प्रवृत्ति लागते व जी विवेचक दृष्टि लागते ती प्रत्येकांतच असते असे नाही. अध्यात्म-तत्त्व जाणण्याकरितां "आत्मा वै श्रोत- व्यः मन्तव्यः निदिध्यासितव्यः" असे म्हटले आहे ते 'आत्मज्ञान' सोपे म्हणून नव्हे, तर कठीण असून खऱ्या ज्ञानाला आवश्यक म्हणून. याच न्यायाने वाङ्मयाच्या क्षेत्रांत देखील काव्याचा वगैरे आत्मा "श्रोतव्यः मन्तव्यः निदि- ध्यासितव्यः" असे म्हटले पाहिजे, आणि या वचनानुसार श्रवण-मनन- निदिध्यासाची ज्याला आवड व शक्ति असेल त्यालाच हा वाङ्मयात्मक आत्मा ज्ञात व लभ्य होईल. केळकरांच्यामध्ये ही आवड आणि ही शक्ति आहे. त्यांनी वाङ्मयसागरावरून अनेक ठिकाणाहून उड्डाण केले आहे व वाङ्मयसागरांत ते अनेक

१८