पान:विचारसौंदर्य.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

समजून वागतात व त्या त्या प्रसंगाला अनुरूप अशा गंभीर भावना व कर्मप्रवृत्ति त्यांमध्ये हीनबल आहेत. पण असे म्हणणे म्हणजे माझ्या म्हणण्याचा विपर्यास करणे होईल. प्रश्न सध्यां गौण म्हणून इतर भावना सोडून देऊन फक्त सात्त्विक संतापाचाच विचार केला तर मला उदाहरणांनी असे सिद्ध करून देता येईल की, वरील आरोप चुकीचा आहे. सरकारच्या दडपशाहीसंबंधाने लिहितांना 'मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असे देवच बोलून चुकलेला आहे' असे व्यंग्यार्थपूर्ण वाक्य काय सात्त्विक संतापाशिवाय लेखणीतून बाहेर पडेल ? म. रा. बोडस यांच्यावर लेख लिहून 'म. रा. बो.' चे 'बोडण' केळकरांनी जे बाहेर काढले होते, शिवरामपंत परांजप्यांनी 'ध्रुवाची गोष्ट खोटी' अशा प्रकारचा मथळा देऊन लिहिलेल्या गोष्टींवर त्यांनी जी गोष्ट लिहिली होती, खाडिलकरांच्या मेनकेंत जी राजकीय कुचेष्टा आली होती तिला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी जे लिहिले होते, प्रो. फडके व प्रो. घारपुरे यांनी १९२१ च्या राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीत केळकरांवर जे आरोप केले होते त्यांवर केळकरांनी शिवाजी-मन्दिरांत दोन दिवस जी भाषणे केली—या व अशा उदाहरणांचा विचार केला म्हणजे केळकरांना संसार म्हणजे केवळ वाङ्मय-क्रीडांगण वाटत नसून प्रसंगानुसार भावनावश होऊन चार हात करणारे ते आहेत हे कोणालाहि कबूल करावे लागेल. पण या प्रसंगी देखील भावनावशतेच्या अनुषंगाने वाङ्मयात्मक रसास्वादलोलुपता दृग्गोचर होतेच, हे ते ते लेख किंवा ती ती व्याख्याने वाचीत असतांना वाचकांच्या ध्यानांत आल्या- शिवाय राहणार नाही.
 आणि याचे खरे कारण असे की, ति कांहीहि करूं लागले तरी त्यांची वाङ्मय- भक्ति डोकावतेच व आपली सत्ता गाजवतेच, इतकी त्यांना ती प्रिय, सहज व दुर्दम्य आहे. अमुक एक प्रसंगावर ते लिहूं किंवा बोलू लागले आहेत आणि त्यांनी त्याला यथार्थ व सुंदर उपमादि अलंकारांनी सुशोभित केलेले नाही असे झालेच नाही. इंग्लिश वाङ्मयांत 'मिडास' नावाच्या एका राजाची एक गोष्ट आहे. या राजाविषयी असे म्हटलेले आहे की, त्याचा ज्याला स्पर्श होई ते सर्व सुवर्णमय होऊन जाई. केळकरांचा हस्तस्पर्श असाच आहे,-जो विषय ते हाती घेतात तो सुवर्णालंकृत होतो ! किंवा आपल्या इकडील वाङ्मयांत युवतींचा हस्त- स्पर्श झाल्यावर लवकरच विशिष्ट वृक्ष फलपुष्पयुक्त होतात असा जो एक कविसंकेत

१५