पान:विचारसौंदर्य.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

प्रहार केले या व अशा विचारांपासून उत्पन्न होणाऱ्या वाङ्मयविषयक स्वसामर्थ्य- प्रतीतीमुळे त्यांना अधिक आनंद होईल, व आपल्या युक्तिवादांतील, भाषेतील, कोट्यांतील वगैरे सौंदर्य पाहून तद्विषयक रसास्वाद घेण्यांत तर ते विशेष रममाण झालेले आपल्या कल्पनेला दिसतील. निदान माझ्या कल्पनेला ते तसे दिसतात. आपण प्रतिपक्ष्यावर केलेला वार कारीगर न होता तो निसटला हे पाहून टिळकांना जे दुःख वाटले असते ते 'आपण वार किती सफाईदार केला होता' या जाणीवेने विशेष कमी झाले नसते. त्यांच्या अंगी बाणलेल्या गीतोपदिष्ट तत्त्वज्ञानाने ते जितके कमी झाले असते तितके ते वरील जाणिवेने कमी झाले नसते. केळकरांचा वार प्रतिपक्षाने चुकविला तर त्यांनाहि दुःख होईलच, पण गीतोपदिष्ट तत्त्वज्ञानापेक्षा स्वकीय वाक्पटुत्वाच्या जाणिवेने ते त्यांना अधिक सह्य होईल. किंबहुना मी असेंहि म्हणू शकेन की, केळकर हे निसटून जाणाऱ्या प्रतिपक्ष्याच्या वाक्कौशल्याची तारीफहि करू शकतील. क्रिकेटच्या भाषेत बोलावयाचे म्हणजे आपण फेंकलेल्या चेंडूमुळे शत्रूची वुइकेट जरी मिळाली नाही, किंबहुना त्याने तो चेंडू बाऊंडरीवर दवडला, तरी देखील ते स्वतःचा चेंडू चांगला फैकला गेला असल्यास त्यांतील कौशल्याचे व असा चेंडू तटविणान्या किंवा मारणाऱ्या शत्रूच्या शहामतीचे क्षणभर कौतुकच करतील व मागूनहि न लाजतां याबद्दल गप्पागोष्ठी करतील. 'कुळकर्णी-लीलामृतांत' रा. पाटील यांनी प्रत्यक्षतः कुळकण्यावर व अप्रत्यक्षतः ब्राह्मणवर्गावर जो ताशेरा उडविलेला आहे त्यावरील केळकरांचा लेख वाचला म्हणजे आपली वुइकेट घेणाऱ्या प्रतिपक्ष्याच्या कौशल्याची ते तारीफ करूं शकतात हे कळून येईल. अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे व केळकरांचे बरेचसें बिनसले असतां देखील केळकर हे अच्युतरावांच्या लेखनशैलीची व वाक्पटुत्वाची प्रांजलपणे स्तुति करीत, यावरूनहि हाच मुद्दा सिद्ध होतो की, केळकरांना वाङ्मयात्मक विलास इतके प्रिय आहेत की या विलासांच्या निमित्ताने शत्रु त्यांना घाव मारूं लागला तर बचाव करता करतां ते घाव घालणाऱ्याच्या चतुराईचें मनांत कौतुक करू शकतात व योग्य वेळी जनांतहि मनांतले कौतुक बोलून दाखवू शकतात.
 वरील क्रिकेटचे वगैरे दाखले घेऊनच काही लोक केळकरांवर असा आरोप करतील की, राजकीय, सामाजिक वगैरे रणांगणांस केळकर हे वाङ्मयात्मक क्रीडांगण

१४