पान:विचारसौंदर्य.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केळकर व कांहीं साहित्यविषयक प्रश्न

 कित्येक लोक क्रिकेट, टेनिस वगैरे खेळ उत्तम खेळतात. पण त्यांच्यापैकी प्रत्ये- काला त्या त्या खेळाविषयी सशास्त्र, सुंदर व मनोरंजक चर्चा करता येईल असे नाही. शिक्षक, सेनापति, मुत्सद्दी वगैरेसंबंधी असेंच आहे; म्हणजे आपआपली कामे चांगली करणारे जे असतात त्या सर्वांना आपआपल्या कामाची मार्मिक मीमांसा साधेलच असे नाही, तर ती त्यांपैकी काहींनाच साधते. साहित्यांतील काव्य- नाटकादि जे प्रकार आहेत त्यांत नामांकित कामगिरी करून दाखवून पुनः तद्विष- यक चर्चा करणे फारच थोड्यांना साधते. कालिदास, भवभूति, ज्ञानदेव, तुकाराम, मोरोपंत, इत्यादिकांनी रसपूर्ण काव्य लिहिली, पण रस चर्चा त्यांना काही साधली नाही प्रयत्न करून साधली नाही असे नव्हे तर त्यांनी या दिशेने प्रयत्नच केला नाही.
 पण ग्रीस देशांतील प्लेटो, किंवा जर्मनींतील गटे, किंवा इंग्लंडमधील वर्ड्सवर्थ, शेली, किंवा संस्कृतमधील रसगंगाधरकार जगन्नाथ कवि, किंवा महाराष्ट्रांतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, यांच्यासारखे असे काही थोडे साहित्यभक्त असतात की त्यांना दोन्ही गोष्टी साधतात. नेपोलिअनप्रमाणे साहित्यक्षेत्रांतील ते पराक्रम करतात; इतकेच नव्हे तर तद्विषयक विवेचमहि ते करतात. किंवा हाच अर्थ निराळ्या तहेनें सांगावयाचा म्हणजे साहित्य-क्षेत्रांतील ते कर्मयोगी व ज्ञानयोगीहि असतात. नरसिंह चिंतामण केळकर हे अशांपैकीच आहेत.
 यापुढे जाऊन मला असेंहि म्हणावेसे वाटते की, वाङ्मयक्षेत्रांतील ते खरे 'भक्ति- योगी' हि आहेत. ईश्वरविषयक भक्तीच्या बाबतीत त्यांना मागे टाकणारे महाराष्ट्रांत आज पुष्कळ लोक सांपडतील; पण वाङ्मयविषयक भक्तीच्या बाबतीत त्यांची

१२