पान:विचारसौंदर्य.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाकाव्ये

विता येईल. अलीकडे बाह्य परिस्थितीमध्ये सापेक्षतः स्थिरता व निश्चितता आली आहे, पण अंतःसृष्टि ढासळत चालली आहे, आणि अतिशयोक्ति करून बोलायचे म्हणजे तेथे बेबंदशाही किंवा अराजकता मांजू पाहते आहे. जगाचा आपणाला अर्थ कळेनासा झाला आहे; अशात लिपीत व भाषेत लिहिलेल्या सुप्रसिद्ध काव्या- प्रमाणे जग हें आपणांस एका अर्थी सार्थ व रम्य असावेसे वाटते, पण हा अर्थ व हे रम्यत्व ही अनुभवाला तर पटत नाहीत, तेव्हा या विश्वात्मक ग्रंथाकडे आपण केवळ साश्चर्य व कुतूहलयुक्त दृष्टीने पाहतो, पण त्यापासून समाधान, उत्साह, प्रसन्नता, स्फूर्ति यांचा लाभ मिळत नाही. His master's voice ('धन्याचा आवाज') या नांवाच्या फोनोग्राफच्या जाहिरातीत एक कुत्रा दाखवितात, तो आपल्या धन्याचा आवाज तर ओळखतो, पण तो कोठून कसा येतो हे त्याला समजत नाही, व खरोखरचा धनी बोलतो आहे की हा भ्रम आहे असा त्याला प्रश्न पड- लेला दिसतो, त्याप्रमाणेच आपली स्थिति झाली आहे; म्हणजे जगाकडे पाहून व त्यांतील : ध्वनि.' ऐकून तो आपणाला ओळखीच्या सारखा तर वाटतो, जगदी- श्वराचा असावा असे तर वाटते पण निश्चय मात्र काही एक करवत नाही, अशी आपली स्थिति झाली आहे !
 अलीकडे धर्माच्या बाबतीत काय किंवा राजकीय व इतर बाबतीत काय, मतामतांचा गलबला आहे; सर्व कल्पना संशयास्पद झाल्या आहेत; कोणतीहि गोष्ट अशी नाही, की तिला जोराचा धक्का मिळालेला नाही. अशा मनःस्थितीत कशाचा विशेष राग-लोभ नसतो, कशाबद्दल विशेष अगत्य किंवा उत्साह वाटत नाही, कांहीहि विशेष आदरणीय व पूज्य वाटत नाही. परंपरेचे संस्कार राहिले आहेत, पण ते पुसट होत चालले आहेत. नवीन संस्कार कोणते करावयाचे हेंच निश्चित नसल्यामुळे कोणालाहि त्यांचे अगत्य नाही. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अली- कडच्या शास्त्रीय युगांत बाह्य परिस्थितीमध्ये सापेक्षतः स्थिरता व निश्चितता, पण अंतःसृष्टीमध्ये अस्थिरता व अराजकता उत्पन्न झाली आहे. अशा मनःस्थितीत कोठल्याहि क्षेत्रांत मोठा पराक्रम कसा होणार ?
 सध्या आपणाला लहान लहान कर्तव्ये, लहान लहान प्रश्न, लहान लहान सौंदर्य दिसतात, पण विश्वव्यापक कर्तव्ये, समुद्रगंभीर प्रश्न व विराट्स्वरूपी सौंदर्ये कल्प- नेलाहि अगम्य झाली आहेत; कारण धर्मावरचीच नव्हे तर नीतीवरची श्रद्धा उडालेली