पान:विचारसौंदर्य.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

पासून काही तरी बोध होतो का ? प्रो. पटवर्धनांनी रुक्ष प्रदेश, नीरस भूरचना, वगैरेंना वर्डस्वर्थ कवीच्या व शेलेच्या स्वभावाचे एक कारण कल्पिलें आहे तें वरच्यासारखेच एका अर्थाने खरहि आहे व बोध-रहितहि आहे ! महाकाव्याच्या निर्मितीला परिस्थिति प्रतिकूल आहे या मुद्द्याचा आतां अधिक विस्तार न करतां अलीकडची अभिरुचीच बदलली आहे या मुद्दयाकडे वळू या. अभिरुचि बदलली ती महाकाव्याच्या अ-निष्पत्तीमुळे बदलली, की अभिरुचि बदलली म्हणून महा-काव्ये निर्माण होत नाहीत, हा येथे प्रश्न उत्पन्न होईल. त्याचप्रमाणे लोकांना अभिरुचि नसली म्हणून विशिष्ट वाङ्मयाची निष्पत्ति तद्भक्तांकडून होण्याची अजीबात थांबते की काय, हाहि विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पण पूर्वीच्या विवेचनाची दिशा ज्याला कळली आहे त्याला या मुद्दयांचा विस्तार करण्याची जरूर भासणार नाही, या विचाराने सदर विस्तार टाळण्याचें ठरविले आहे.
  अलीकडे-महाकाव्ये निर्माण न होण्याचे कारण म्हणजे निर्माण करण्यास समर्थ असलेली प्रतिभा अलीकडे दिसत नाही असे जर मी म्हटले तर काही लोक कुचेष्टेनें " हे सांगायला तुम्ही नको' असे मनांत म्हणतील, कारण 'कार्यनिर्मितिसमर्थ ' कारण नाही, म्हणून कार्य नाही' असे म्हणण्यासारखेच ते होईल. पण याशिवाय दुसरे उत्तर देणे कठीण आहे. कारण प्रतिभा कशी, केव्हां, कोणत्या कारण- संघाताच्या योगें, उत्पन्न होते हैं जोपर्यंत आपणास सांगता येत नाही तोपर्यंत या प्रश्नाचा उलगडा होणे शक्य नाही. तथापि निराश न होतां या प्रश्नाचा आपण जर विचार करू लागलों तर पुढील कल्पना सुचतील, वत्या काहींना ग्राह्य वाटतील.
  महाकाव्य-निर्मिति-समर्थ प्रतिभा असल्यावर ती कोणत्याहि परिस्थितीत तसलें काव्य लिहील हे जरी खरे असले, व तिच्या अभावी कोणत्याहि परिस्थितीत उत्तम महाकाव्य उत्पन्न होणार नाही हे जरी खरे असले (लांबलचक व भुरळ घालणारी भाषा टाकून बोलायचे म्हणजे महाकाव्य की उत्पन्न होतात व कां होत नाहीत हे जरी सांगता येत नसले !), तात्पर्य, प्रतिभेची निर्मिति कशी होते हैं गूढ व दुज्ञेय असले, तरी सद्यःकालीन सुसंस्कृत समाजाची मनःस्थिति अलीकडे कशी झाली आहे याचे दिग्दर्शन करून अलीकडे महाकाव्ये निर्माण करण्यास समर्थ असलेली प्रतिभा का दिसत नाही याचे एक कारण सुज्ञांच्या विचाराकरितां सुच-