पान:विचारसौंदर्य.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाकाव्य

बाबतींत गोंधळ असतो तो दूर करण्याला असले विडंबन आवश्यक आहे. प्रो.पटवर्धनच उपरिनिर्दिष्ट टोपेत म्हणतात--
  " रुक्ष प्रदेश, नीरस भूरचना, सदा बदलणारी हवा, धबधब्याचा आवाज वगैरे गोष्टींच्या साहचर्यामुळे वर्डस्वर्थ कवीचा स्वभाव सरळ, साधा, गंभीर, न डगमगणारा, प्रसंगाला निमूटपणे तोंड देणारा, धिमा आणि नीरस किंवा विनोद- शून्य झाला असे म्हणावयास जागा आहे. परंतु त्याच किंवा तशाच धबधब्यांच्या, विजांच्या, वावटळींच्या, झंझावातांच्या संगतीमुळे शेले, बायरन यांच्या वृत्ती उद्दाम, बेधडक मुसंडी मारणाऱ्या झाल्या असाव्या." [काव्य आणि कान्योदय, पृष्ठ २०]
 वरील अवतरणांतील हेत्वाभास दाखविण्याकरितां एक कल्पित गोष्ट सांगणे सोईचे आहे. काही मंडळी एका बार्गेत गेली असता त्यांना एक गुलाबाचे झाड दिसले. त्यांतील एकानें गुलाबाचे एक मोठे फूल तोडून हुंगले; दुसऱ्याने एक अर्धविकसित फूल तोडून बटनहोलमध्ये घातले; तिसऱ्याने पाकळ्या. तोडून टाक- ण्यास आरंभ केला; चवथ्याने “ या गुलाबाचे फ्रेंच नांव कायसेंसें आहे ते काय बरे?" असे म्हटले व डोके खाजविण्यास आरंभ केला; पांचव्याने आमच्याकडे या फ्रैंच जातीचा गुलाब नाही, पण दुसऱ्या जातीचा आहे असे म्हटले; सहाव्याने आपल्या मुलीकरितां काही फुलें तोडली; सातव्याने आपल्या सहचरीला एक फूल तोडून दिले व आठव्याने गुलकंदाकरितां कांही फुलें तोडून हातरुमालांत घातली ! नववा मागे मागे रेंगाळत होता त्याचे कारण असे की, त्याला आपल्या गत प्रियतमेच्या गुलाबी गालांची व हास्याची आठवण होऊन तो उदास झाला होता; आणि दहावा गालातल्या गालांत हंसत तेथेच उभा होता, कारण त्याला गडकऱ्यांच्या 'गुलाबी कोड्या' ची आणि केशवकुमार अत्र्यांच्या 'प्रेमाच्या गुलकंदा' ची त्याच वेळी आठवण झाली ! आतां प्रस्तुत गुलाबाचे झाडच तेथे नसते तर गुला- बोच्या संबंधी या भिन्न वृत्ती व ही भिन्न कम शक्यच नव्हती; तेव्हां 'गुलाबाचें झाड' ही परिस्थिति या सर्व कार्याचे कारण आहे. आणि यावर कोणी जर आक्षेप घेऊ लागला की एकच कारण भिन्न कार्ये कशी घडवून आणते, तर प्रो. पटवर्ध- नांप्रमाणे 'स्वभावभेदामुळे ' हे उत्तर सांगून मोकळे व्हावे ! उपरिनिर्निष्ट दहाहि कायें गुलाबाच्या झाडाच्या अभावी अशक्य होती, तेव्हां या अर्थाने ते झाड 'कारण' या संज्ञेस पात्र असले, तरी या झाडामुळे ही कार्ये घडली या म्हणण्या-