पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अधुऱ्या स्वप्नांची अक्षय वेल



 माझ्या मनातल्या अश्विनाला पांढऱ्या बूच फुलांचा घनदाट गंध आहे. पंचवीसतीस वर्षांपूर्वीचा तों उंचउंच बूचवृक्ष आज हयात असेल का? कदाचित नसेलही. आणि त्या वृक्षाशेजारीच असलेलं राजलक्ष्मी नायरचं ते छोटंसं घरही नसेल. त्यावेळीच ते घर मोडकळीला आलेलं होतं. राजूच्या अम्मीचा हात घरावर फिरल्यानं सुबक आणि नेटकं वाटत असे.
 दर वर्षी आश्विन येतो. बूचफुलांचे गालिचे पायतळी पसरून , बुचाचे उंच झाड आभाळात डोके खुपसून विरक्तपणे उभे असते. त्या देठदार फुलांच्या वेण्या मुलीच्या लांड्या केसांत माळता माळता माझं मन मागे ... मागे जाते.
 मला आठवते राजू. राजलक्ष्मी नय्यर. सावळ्या कृष्णतुळशीच्या रंगाची. न्हालेल्या केसांवर खोबरेल तेलाची तकाकी पसरलेली. बुचाच्या फुलांची दुपदरी वेणी केसात माळलेली. उंच कपाळावर चमकीची टिकली. भांगात हळदशेंदूराचा ठिपका. कपाळावर भस्माची आडवी चिरी .डोळ्यात काजळाची रेघ. काहीशी बाहेर डोकावणारी. पायांत मुके पैंजण.
 राजूचं घर खिस्ती आणि मुसलमानांच्या वस्तीत होतं. घराशेजारीच ख्रिस्ती लोकांचं स्मशान होतं. मोकळ्या जागेत राजूचं दुमजली घर. खाली स्वैपाकघर आणि पडवी. वरती झोपायची खोली . पडवीची अर्धी भिंत बांधलेली . आणि त्यावर लाकडी पट्ट्यांची जाळी बसवलेली . त्या जाळीला लगटून गारवेल थेट वरपर्यंत चढलेला. समोर चिमणसं अंगण. अंगणात एक नारळाचं झाड , बुचाचं झाड नि बाकी झिपरी शेवंती. त्या घरात राजू आणि राजूची आई रहात असे. त्या एकाकी घराभोवती गूढ वलय होते . राजू कधीच कुणाला घरी नेत नसे किंवा आमच्यातही मिसळत नसे.
 आम्ही आठवीत होतो तेव्हाची गोष्ट. त्या वर्षी कसे कुणास ठाऊक, पण सारेच ऋतू आम्हांला खूप काही देऊन गेले. सातवीपर्यंन्त शाळेचे पटांगण दणाणून सोडणाऱ्या आम्ही काहीशा संथ झालो होतो. मधल्या सुटीत गरुडबागेतली बकुळीची फुलं वेचण्यासाठी भरारा धावणाऱ्या आम्ही किंवा सोनसाखळी नाहीतर शिवणापाणी खेळण्यासाठी भरारणाऱ्या आम्ही , चक्क कोंडाळं करून खुसूखुसू गप्पा मारू लागलो.

॥ ८८ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....