पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांडतो . पारिजाताचाही . बकुळीला एक उदास कोमजलेपण असते . पारिजाताची फुले पहाता पहाता कोमेजतात . पण बुचाच्या फुलांचा गालिचा पहाटेसारखा ताजातवाना ! जणू शुभ्र पहाट झाडाखाली विसावलीय. उन्हं चढत जातात तसतसा मातकट रंग पाकळयांवर चढत जातो.
 बुचाचे झाड तसे विलायतीच . देव्हाऱ्यात समर्पण करण्याचे भाग्य या फुलांना लाभत नाही . दारात वा अंगणात हौशीने हे झाड क्वचितच लावले जाते. संस्कृत कवींनी रानीवनीच्या बहारांचे वर्णन मोठ्या रसिक नजरेने केले आहे. त्याकाळी हा वृक्ष नसावा. एरवी आकाशमोगरीचे मिनारी सौंदर्य त्यांच्या नजरेतून खासच निसटले नसते. आकाशाला नजरेत घेणारी आकाशमोग़री. आकाशमोगरीचे खोड, उंच बांध्याचे असते. निबोणी खोडाचा अडबूखडवूपणाही नाही किंवा चाफ्याच्या खोडाचा नितळ मऊपणाही नाही. पानेही सुरेख नसतात . मातकट हिरवी आणि डिक्षांची. लिंबाच्या पानांसारखी मोहरेदार .हे झाड कळ्याफुलांच्या झुबक्यांनी गच्च लखडते तेव्हा मोठे देखणे दिसते . रात्रीच्या अंधारात फुलांनी लखलखलेले हे झाड .जणू आकाशगंगाच झाडावर उतरलीय.
 आश्विनातली पहाट असावी . आकाश नितळ निरभ्र असावे . आकाशमोगरीच्या पायतळी सांडलेले चांदणे ओंजळीत साठवावे. धुंद गंध श्वासावासांत भरून घ्यावा आणि आपणही आकाशमोगरी व्हावे!

܀܀܀



आकाशमोगरी ॥८७॥