पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आमच्या शाळेत ही बुचाची झाडं अगदी चिक्कार . पण एवढ्या पाचशे पोरींच्या केसांवर माळण्याइतकी फुलं कशी ढाळणार ती ? मग फुलांसाठी आमच्या माऱ्यामाऱ्या व्हायच्या. झिंज्यांची ओढतोड. या नादात परकराच्या नाहीतर झग्याच्या ओच्यात गोळा केलेली फुलं मातीत सांडायची. मातकटून जायची .
 मी अगदी छोटी होते तेव्हापासून या फुलांचं मला वेड . मनात येई, इतक्या टवटवीत सुंदर फुलाला हे अडाणी नाव कसं? बुचाची फुलं नाहीतर अजरणी! मी मनातल्या मनात बहुधा सुरेखशा नावाचा शोधही घेत असेन . कविवर्य बा.भ.बोरकरांनी या फुलांना दिलेले आकाशमोगरी हे नाव वाचण्यात आले नि माझ्या मनाचा शोध थांबला. तेव्हापासून अगदी हौसेने हेच नाव. वापरते मी!
 आकाशमोगरी. मोगरीसारखे राजहंसी. फुलांचा बांधा उभार , पण टोक वरी घेरदार कळी , मोगरीच्या कळीसारखी कबुतरी! घुमारलेली रंगही शुभ्र , किंचित लालच झांक असलेला . पाकळ्या रेखीव , एकाला एक जोडलेल्या , दाटीवाटी नाही. जिथल्या तिथे फुललेल्या. पाकळी नितळ , तरीही काश्मिरी गालिच्यासारखी दडस . दोन बोटांत धरून चिरमळायची आणि फूऽफू करून फुगवायची.. छान फुगा फुगतो. लगेच कुणाच्या तरी कपाळावर टचकन फोडायचा. नुकत्या फुललेल्या चारपाच फुलांची देठं शाईच्या दौतीत खोचून द्यायची . झाली ऐटदार फुलदाणी तयार. किंवा कानाच्या भोकातून देठ अडकवून फुलांच्या कुड्या घालायच्या. शाळेतल्या बाकांवर अशा फुलदाण्या ऐटीत मिरवायच्या आणि पोरींच्या कानातल्या सुगंधी कुड्या खऱ्या मोत्यांपेक्षा झगमगत. बुचाच्या फुलांतला, मध देठाच्या पुंगळीतून चोखताना मज्जा यायची. लांबच लांब देठातून सुक सुक असा आवाज करीत मध ओढायचा. जेमतेम. जिभेवर उतरेल इतकाच थेंब. पण स्ट्रॉमधून कोकाकोला पिण्यापेक्षाही त्याची लज्जत न्यारीच!
 बुचाच्या पुंगळीदार , रेशमी देठांना एकमेकांत गुंतवून केलेल्या वेण्या किती देखण्या दिसतात! वरच्या बाजूला नेटकेपणानी जडलेली फुलांची रांग ,खालच्या बाजूला हारीने उभारलेली देठं आणि दोहोना सांधणारी तीनपदरी साखळी . एकेरी दुहेरी वेणी. पैंजणवेणी. एक ना दोन , नाना प्रकार या वेण्यांचे . आई वेण्या करायला शिकवायची. शिकण्यात निम्मीशिम्मी फुले देठापासून तुटून पडत . शिवाय देठांची मिठी सैल होऊन वेणी निखळायला वेळ नाही. मग घरभर फुलांचा पसारा.
 बहरलेल्या आकाशमोगरी झाडांचा गंध शंभर हातांवरून श्वासांना जाणवतो. सोनचाफ्यासारखा गडद गंध नाही की जुईकळ्यासारखा हळवा गंध नाही. पण तरीही अतीव मधुर, थंडीचा शिडकावा असलेला , श्वासाश्वासांत रेंगाळणारा. मला या गंधात मातीच्या खमंग गंधाची एक मात्रा मिसळली आहे असे वाटते . बकुळीचा सडा पायतळी

॥ ८६ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....