पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आकाशमोगरी



 आकाशमोगरीचे फूल पाहिले आहे कुणी? आ..का..श..मो..ग..री ! काऽही आठवत नाही ना? बटमोगरी..दुधीमोगरा. .बत्तीसमोगरा..हजारीमोगरा..मदनबाण, सारे मोगऱ्यांचे बहर नजरेसमोरून तरळून जातात. पण आकाशमोगरी काही आठवत - नाही.
 "मग अजरणीची किंवा बुचाची फुलं पाहिली आहेत? सगळेजण अगदी मोठा होऽ लांबवाल .अर्थात मनातल्या मनात! मग ऐका तर, याच फुलांना म्हणतात आकाशमोगरी. सांगलीमिरज भागात या फुलांना अजरणीची फुलं म्हणतात. तर खानदेशमराठवाड्यात बुचाची फुलं म्हणतात.
 श्रावणझडी ओसरतात. भादव्यातली संतत धार थांबते. आकाश कसे निरभ्र होते! कधीकधी नजर चुकवून एखादे ढगांचे पिल्लू भटकायला निघाले तरच दिसायचे. झाडांचे तरतरीत शेंडे न्हाऊनमाखून, ऊन खात, चकाट्या पिटीत बसतात. पूर ओसरतात. पाणथळी जिरतात. सारे कसे शांत शांत होते. एका अश्विनी पहाटेला उमलत्या थंडीची बोटे झाडापानांवर, कळीपाकळीवर गुदगुल्या करीत फिरू लागतात . या गारेगार स्पर्शाने पहिली जाग येते आकाशमोगरीला.
 आकाशाचा ध्यास घेतलेल्या या उंचच उंच झाडांवर आषाढ कोसळून जातो. श्रावण झिमझिमून जातो. भादवा बरसून जातो. पण ही झाडे रिती ती रितीच! आकाशाकडे एकटक नजर लावून बसण्याचं वेड काही कमी होत नाही यांचे. दिवाळीची जंतरमंतरं हवा येते. रेंगाळत्या सरी आश्विनमाळांसोबत बरसून जातात. अन् याचे खोड जागून उठते. पान न् पान तरारून जाते . पहाटे धुकं दाटतं. बुचाच्या झाडात पसरतं. फांद्यांच्या टोकांशी, डहाळांच्या शेंड्यांशी देठदार कळ्यांचे झुबके धरतात. बाळाच्या नखुल्याएवढ्या असणाऱ्या या कळ्या थंडीच्या कुशीत सटासट वाढू लागतात. आठचार दिवसांत , लांबचलांब पुंगळीदार देठांच्या टोकाशी शुभ्रकळी टप्पोरते.अगदी मोगरीच्या कळीसारखी! कळ्यांच्या अनिवार भाराने फांद्या जमिनीकडे झुकतात. आकाशाचा ध्यास घेणारी नजर मातीच्या सावळेपणालाही भुलते. एका आश्विनपहाटेला पायतळी सांइते पांढऱ्याशुभ्र फुलांची तरतरीत नक्षी.



आकाशमोगरी ॥८५॥