पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 केवड्यासारखे गोरेपण असणे भाग्याचे सौंदर्यलक्षण मानतात आपल्याकडे. 'केवड्याच्या पातीसारखी गोरीपान आहे हो सूनबाई !' असे सांगताना सासूबाईंचा आवाज कौतुकाने भरून येतो. शेवंतीचा रंग पिवळाच. पण नको तितका गडद असणारा. झेंडूचा जर्द पिवळा गोंडेदार. पण डोळ्यात खुपणारा, सोनचाफ्या पिवळा रंगमात्र मोहक असतो. पण केवड्याच्या पिवळेपणातले मार्दव त्यात नसते. पानाच्या कडेचे छोटेच पण तीक्ष्ण काटे. तर पात्याचे मधले अंग मऊसूत आणि नितळ असते. या उंची टफेटापोताला नखाएवढी जर चिरी पडली तरी सारी बादशाही शान ती बिघडवून टाकते. चिरेपाशी केवडा काळा पडतो. केवडा सुकला वा काळा पडला तरी त्याचा गंध मात्र रतिभरही कमी होत नाही. तो अक्षयच असतो. वही वा पुस्तकांच्या पानात खूण म्हणून केवड्याचे पाते ठेवले की पुस्तकालाही केवड्याचा गंध येई, पान उघडताच गंधाचे थवे अवतीभोवती उडत.
 केवड्याच्या कणसाच्या मध्यात , पिवळसर मातकट रंगाचा तुरा असतो. त्यात केवड्याची पावडर गच्च भरलेली असते. या तुऱ्यातून पानांची मुळे फुटलेली असतात. पेंढीसारखे मातकट पिवळे तुरे नि बारीक पराग. हा तुरा आपटून खाली सांडणारी पावडर तोंडाला फासण्याचे उद्योग लहानपणी सगळीच करतात. या तुऱ्यांचे छोटेछोटे तुकडे कापड्यात ठेवले तरी कपड्यांना सुरेख सुवास लागतो. शिवाय कसरही लागत नाही.
 केवड्याच्या वेण्या खूप तऱ्हांनी गुंफतात. तिपेडी वेणी, दुपेडी नागमोडी वेणी, खण बांधून कार्डावरं टाचून केलेली वेणी ; सतरा प्रकार ! वेटोळे करून वेणीत खोवले तरी छान दिसते. मला खूप आवडे . रंगापेक्षाही त्याच्या रेंगाळत्या मधुगंधाचे खरे कौतुक.
 मंगळागौरीच्या वा हरितालिकेच्या पूजेची मांडणी करताना केवड्याचे पान फडा काढून डोलणाऱ्या नागासारखे डौलदार दिसते. महादेवाला बेल प्रिय, पण पिंडीवर ठेवलेले केवड्याचे पान पाहून मन प्रसन्न होते . गणपतीबाप्पांना तर केवडा हवाच. गणेशचतुर्थीला एरवी दोन आण्याला मिळणारे पान आठ आण्याला मिळे. पण घ्यावेच लागे. आजोबा होते तोवर दर श्रावण सोमवारी केवडा घरात येत असे . केवडा महागेल या हिशेबाने गौरीगणपतीच्या आधी चार दिवस भलेमोठे सोनकणीस घरात येई. ओल्या फडक्यात नीटपणी गुंडाळून ठेवण्याचे काम आई करी. वेणीत माळायला हवे म्हणून एखादेच पान गुपचूप पळवायचे तरी हिम्मत होत नसे .
 श्रावणातल्या कलत्या दुपारी, उतरत्या उन्हात लकाकणारे सोनकणीस फार लोभस दिसते. मावळतीची मृदुल किरणे शेंड्यावरच्या कणसावर पसरतात नि केवड्याच्या पिवळेपणावर आगळीच लकाकी चढते. अशावेळी पावलं आपोआप तळ्याच्या वाटेने वळतात. हे सारे नजरेत साठवून घेताना मीच सोनकणीस होऊन दरवळत रहाते.

܀܀܀

॥ ८४ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....