पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलीच्या घरच्या परिस्थितीचीही माहिती उलगडत जाते. हेमाच्या घरची स्थिती इतकी गरीबीची की पाटीपुस्तकासाठीही तिला पैसे मिळत नाहीत. तशात मास्तर मारकुटे. पाळी सुरू झाल्याने मंगूची शाळा सुटते. सावत्र बाप, आई कामाला जाणारी, त्यामुळे मुलांकडे घरी कुणीतरी पहायला हवे म्हणून अलकाची शाळा बंद. वर्गातल्या राजूचे प्रेमपत्र आले म्हणून सरोजचे नाव शाळेतून काढले जाते.
 अशा या कहाण्यांतून सामाजिक वास्तवाचा एक विदारक पट उभा राहतो. नकुशा हा चित्रपट पाहताना श्रीमंताघरच्या मोनिकाच्या मनातली अस्वस्थतेची भावना उसळून डोके वर काढते. या चित्रपटात अनेक मुलींच्या नंतर जन्माला आलेल्या आणि आईवडिलांना नकोशा वाटणाऱ्या मुलीचे जीवन दाखविले आहे. ते पाहून मोनिकाला जाणवते की, अरे मी तर खूपच सुखी आहे. नशीबवान आहे. मला हवे ते सहजी घरी मिळते. ... या मुलीला किती कष्टाने जगावे लागते. हा एक सामाजिक मानसिक धक्काच असतो आणि तो तिला वास्तव जगाचे भान देतो. घरात मुलगी होणे हे अनेक कुटुंबात आजही अपराधीपणाचे ठरते. मुलींची हेळसांड होते.
 शैलाताई स्त्रियांच्या जीवनातल्या अशा अनेक दुखऱ्या भागांकडे लक्ष वेधतात. सुधारक मुस्लिम कुटुंबात वाढलेल्या मोहसिनाला बी.ए. बी.एड. झाल्यावर शिक्षिकेची नोकरी मिळते. नवरा मुंबईत इंजिनियर. मूलतत्त्ववाद्यांच्या विचारांची लाट आल्यावर सासरा तिला सांगतो : आजसे बहू बुर्का पहनके कॉलेज जाएगी. ती नाइलाजाने रस्त्यातून गोषा घालून जाते. तिचाच आदर्श ठेवून वर्गातल्या मुस्लिम मुलीही गोषा घालून येऊ लागतात. तिला भयंकर दुःख होते. आपण पराभूत झालो याची टोचणी तिला वाटते. ती शैलाताईंना म्हणते, "मॅडम, माझं बुर्का पहेननं पाहून माझ्या कॉलेजातल्या माझ्या जमातीच्या मुलीही आता बुर्का पहेलू लागल्या आहेत. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रश्न उभे आहेत. त्यांचं दुःख मला खुप बोचते."
 तिचे सुधारक मनाचे वडीलही तिला सासरशी जुळवून घ्यायला सांगतात तेव्हा ती अगदीच हताश होते.
 उर्मिलाचा नवरा क्लासवन ऑफिसर. हौशी, रंगेल. प्रणयाचे रंग गडद होण्यासाठी मद्य आवश्यकच असे मानणारा. बाळंतपणासाठी माहेरी गेलेली उर्मिला म्हणते, "तीन महिन्याच्या गौतमीला घेऊन घरी आले तेव्हा लक्षात आलं की नवरा दारूच्या कवेत गेलाय आणि दारू घेतली की त्याला बाई लागतेच. मग ती कुणीही असली तरी चालते. मीही त्याच्या दृष्टीने बाईच होते. पण आई झाल्यामुळे माझ्यातले बाईपण हरवत चालले होते. त्याला जे हवं असे ते मला देता येत नसे. मग काय वाट्टेल ते ! ..." ही उर्मिलेची व्यथा आहे. तिला एकटे एकटे वाटते. गौतमीला भावंड असावे- पण ते