पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काम पाहत असताना, शैलाताईचे काही ललित लेख प्रसिद्ध केले.
 त्यांच्या लेखनाची शैली काव्यात्म होती. इंदिरा संतांच्या कविता, दुर्गा भागवतांचे ऋतुचक्र, पाडगावकर-बापट यांचे काव्य यांचा प्रभाव त्या लेखनात जाणवत होता. कल्पनांचा पिसारा, प्रतिमांचा पसारा, खळाळता उत्साह, चैतन्याचा प्रवाह त्यामधून जाणवत होता.
 पुढे डॉ. द्वारकादास लोहिया यांच्याशी प्रेमविवाह करून त्या सौ. शैला लोहिया झाल्या. अंबाजोगाईला स्थायिक होऊन महाविद्यालयात अध्यापन करू लागल्या. पतीपत्नी दोघेही सामाजिक बांधिलकीच्या भावनेने समर्पण वृत्तीने विविध उपक्रमांचे आयोजन करीत राहिले. मानव लोक व मनस्विनी या संस्थांद्वारे त्यांनी अंबाजोगाई परिसरातील परित्यक्तांना आधार दिला; गरीब मुलांना शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून दिल्या. अवतीभवतीच्या ग्रामीण क्षेत्रात नियमित वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी योजना आखल्या. त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरही महिला बालकल्याण कार्याशी संपर्क ठेवून सतत वैचारिक व सामाजिक भूमिका अद्ययावत राहावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. अंबाजोगाईला जाऊन त्यांच्या कार्याची झलक पाहण्याचा योगही मला आला. त्यांच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरही गौरव झाला. आंतरराष्ट्रीय महिला परिषदांच्या निमित्ताने परदेशांचे दौरेही झाले. आत्मशोध, आत्मचिंतन अखंड चालू राहिले. आणीबाणीच्या काळात डॉ. द्वारकादास लोहिया यांना कारावास घडला.
 राष्ट्रसेवादलाच्या व कलापथकाच्या माध्यमातून समूह जीवनाची सर्वस्पर्शी अनुभूती संवेदनाक्षम वयातच खोलवर रुजल्याने सामाजिक न्याय, समान संधी, सर्वधर्मसमभाव, स्त्रीपुरुष समानता, लोकशाही समाजवाद, राष्ट्राभिमान, श्रमप्रतिष्ठा यांच्याविषयीचे भावनात्मक अधिष्ठान पक्के झाले आणि सांस्कृतिक संक्रमण तळागाळापर्यंत पोचवण्यातले थ्रिलही जाणवले. "कलापथकाने आमच्या स्वप्नांना पाय दिले आणि सहजीवनाचा पाठ गिरवतानाच जीवनसाथी निवडण्यासही प्रोत्साहन दिले." तृणमूल कार्यकर्ता (ग्रास रूट वर्कर) लोकांचा सहभाग (पीपल्स पार्टिसिपेशन) वगैरे कल्पना सेवादलाच्या माध्यमातून फार आधीपासून प्रत्यक्षात आल्या होत्या. त्याच जोडीला साहित्याच्या अभ्यासामुळे एकूण जीवनाकडे आणि विशेषत: स्त्रियांच्या जीवनाकडे बारकाईने पाहून, त्यांच्या व्यथावेदनांचा वेध घेण्याचेही वळण मनाला आपोआप लाभले. बेशरमीची झाडे, उमलतीचे रंग, फुंकर हे या पुस्तकातील लेख त्याची साक्ष देतात.
 शिक्षण अर्धवट सोडलेल्या मुलींचे एक शिबिर उदगीरला आंतरराष्ट्रीय बालिका वर्षानिमित्त घेतले जाते. त्यासाठी धुळे परिसरातील काही मुलींना शैलाताई घेऊन जातात. जीपमध्ये त्यांच्याशी गप्पा मारतात. त्यातून त्या त्या