पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देण्याची ताकद या दारूमुळे संपली आहे हे वास्तव लक्षात घेऊन उर्मिला म्हणते,
 "माझ्या घरात परदेशी टेपरेकॉर्डर आहे, टेप आहे, मिक्सर आहे, फ्रीज आहे. खूप काही आहे... मीही आहे."
 फ्रीजवर ठेवलेला चकचकीत प्लॅस्टिकचा फ्लॉवर पॉट बनून इथेच राहू का ? असा प्रश्न तिला आपल्या मैत्रिणीचा सुखी संसार पाहून पडतो. स्वत:च्या अस्तित्वाचा शोध तिला घ्यायचा आहे. हवं असलेलं घर आणि हवी असलेली पायाखालची जमीन मिळवण्यासाठी ती मैत्रिणीकडे मदत मागते आहे.
 केरळमधल्या राजलक्ष्मीची समस्या वेगळीच आहे. तिचे वडील मुंबईला रेल्वेत नोकरीला. तिची आई त्रिवेंद्रमला नर्स असताना त्यांचा आंतरजातीय विवाह झाला. वडिलांनी राजलक्ष्मी व तिची आई यांची राहण्याची व्यवस्था धुळे येथे केली. वडील अचानक वारले. या मायलेकींना धुळे सोडून केरळमध्ये जाणे भाग पडले. तेथे त्या दोघी सासरच्या अपरिचित वातावरणात कशा जगात असतील असा प्रश्न राजलक्ष्मीची मैत्रीण म्हणून लेखिकेला पडतो.
 ठाकर जमातीत विशीतल्या शोभाचा नवरा पन्नाशीतला. तोही क्लीनर, दीड वर्षानं तिला मूल झाल्यावर दुसऱ्या बाईला घरात आणतो. कोर्टात तिची केस स्त्री हक्क समिती लढवायचे ठरवते.
 "....हम औरता तो क्या, बेशरमीकी झाड हां, किती बी तोडा किती बी कापा. अमाले पानं फुटायचीच." असं म्हणणाऱ्या सकीनाचा बिनतोड युक्तिवाद निरुत्तर करणारा आहे.
 "भाबी, माँ के घरमें कौन है अपना ? इनके पल्लों में डाल दिया है. इधरीच ठीक है. आन जाणार कुठं मी? मी मेले तरी यानला बायकू भेटेल. पन पोरानला माय मिळेल का? तुम्ही एवढ्या शिकला. भाईर जाता. भासनं देता. पण दादा वसकतातच ना तुमच्या अंगावर?"
 ग्रामीण स्त्रियांच्या समस्यांना हे असे अनेक पदर आहेत. ग्रामीण स्त्री ही अनेक आघाड्यांवर लढत असते. चूल सारवण, लेकरांच संगोपन, सडाअंगण, खाणंपिणं, जनावरांची देखभाल, गवऱ्या थापणं, शेतातली कामं, पेरणीसुगीची धावाधाव, लाकूडफाटा आणणं, तुरांट्या रचून ठेवणं, डाळीसाळी करणं, शेंगा फोडणं, बैलामागं उभं राहणं, शेतात दारं धरणं, बाजारात माळवं विकायला जाणं, मळणी उफणणी करणं. फाटक्या पदराचा आडोसा लेकरांना करून सावली देणाऱ्या, त्यांना वाढवणाऱ्या या बाया ही सगळी यातायात करताना स्वतः निष्पर्ण वृक्षासारख्या वठून जरठून जातात, असे सांगून शैलाताई प्रश्न करतात : जीवनात माणूस म्हणून जगताना, मनात उगवलेल्या इच्छा, आंकाक्षा, स्वप्नं इतक्या निर्मळपणे फेकून द्यायला कोणी शिकवलं यांना ?