पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळणार. चार आणे फेकून मिळणारे एखादे पान घ्यायचं नि नाकाला टेकून दीर्घ श्वासात साठवायचे ! वस्स . पण माळ्याच्या दुकानातून विकत घेतलेल्या सोनकणसापेक्षा केतकीबनाचे काटेरी रस्ते तुडवून. हातापायात गेलेल्या काट्यांची सल सोशीत , महत्प्रयासाने खुडून आणलेल्या कणसातले अगदी गाभ्यातले कोवळे पान वेणीवर माळण्यात केवढे सुख असते!दर सोमवारी आम्ही तळ्यातल्या महादेवाकडे जायचोच . केवड्याच्या कणसांसाठी भाऊरायांना लोणी लावावं लागायचं. सगळ्या अटी मान्य कराव्या लागायच्या . भलामोठा टोकर घेऊन आमच्या स्वाऱ्या भर उन्हात ...अर्थात् श्रावणातलं ऊन .. तळ्याकडे जायच्या. कोणी येण्याच्या आत पाचदहा कणसांचा फडशा पाडून आम्ही धूम घराकडे यायचो. केवड्याच्या नादात नागाचे भयही विसरत असू आम्ही. मात्र ही मर्दुमकी घरी सांगण्याची हिंमत नसे. मग आईला कशा नि सारख्याच थापा मारायच्या यावर चर्चा होई. "आई ग,पक्षकार नाही का? मोराण्यांचा.. त्याने दिलीन बघ." अशी लोणकढी थाप. शिवाय,"ए तुला नव्या पद्धतीची वेणी देऊ करून?." अशी-मखलाशी वर करायची!
 पृथ्वीला गंधवती धरा म्हटले आहे. मातीच्या कणाकणांत, साठलेल्या गंधाच्या अत्तरी कुप्या फुलाफुलांतून पानापानांतून मुक्तपणे उधळून देत असते ती. सुगंध तरी किती तऱ्हेचे. जुईकळ्यांचा हळवा आर्त गंध. तर दूरवरूनही भारून टाकणारा केवड्याचा मत्तगंध ! सारेच मधुर आणि हवेहवेसे वाटणारे .
 केवड्याचे एखादेच पान घरात असले, तरी घरभर दरवळत रहाते. वरून हिरव्या, काटेरी पानांनी झाकलेले कणीस उलगडण्याचा मोह तळव्यांत काटे रुतले तरी आवरत नाही. काटेरी पाने दूर केल्यावर, आतल्या गहूरंगी, तकतकीत उभार पानांची एकमेकांत गच्च मिटलेली ओंजळ , गर्भवतीच्या तेजाने झळकणारी. एकटक न्याहाळली तरी नजर निवत नाही. फूल आणि गंध यांची सांगड चटकन जुळते. पण पानांना गंध असतो हे मानायला मन तयारच होत नाही.
 स्वर्गीय गंधाचे लेणे ल्यालेला केवडा हा पानांचाच एक प्रकार आहे. खाली बुडाशी अरुंद ,मध्यात रुंदावत, वर निमुळत्या होत गेलेल्या पन्हाळीसारखे दिसणारे केवड्याचे पान दिसते मोठे सुरेख! गोऱ्यापान ओलेतीच्या रेखीव पाठीच्या पन्हाळीसारखे, जणू दोन पाने कलती करून मधोमध जोडली आहेत.
 केतकी आणि नागांचे सख्य कथापुराणांतून सांगितलेले असते . केतकीच्या बनात नागांची वेटोळी दिसतात. कोणी म्हणतात की या साऱ्या भाकडकथा. नागाला गंध येत नाही. घ्राणेंद्रिय त्याला नसतेच. पण एक मात्र खरे, केवड्याच्या पातीचा आतून वळलेला रुंद भाग, पिवळ्याजर्द नागाच्या उभारलेल्या फण्याची उन्मेकून आठवण करून देतो... पानांचे पिवळेपण नितळ नि तकतकीत . श्रावणातल्या तलम , फिक्या उन्हासारखा हळुवार पण तेजस्वी, केतकी रंग पाहिला की जडावल्या पावलांनी भारलेला , गोरापान गर्भालस तेजस्वी मुखडा समोर उभा रहातो.



सोनकणीस ॥८३॥