पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मारवाडी समाजात दहा हजाराखाली कोण हुंडा घेणार? शिवाय शेटजींना साधायचा होता पुण्यधर्म . तिघांचाही सोय झाली . लग्नाच्या सौद्यात सोय पाहिली जाते वापाच्या खिशाची . पोरगी घराबाहेर काढायची इतकच तिला महत्त्व.
 कमल धानोऱ्यात आली. सासरे सनातनी. घुंघटाची लांबी इंचाइंचानं माेजणारे. काही वाचायला मिळावं म्हणून ही आसुसायची , एकदा नवयाऱ्याने मासिक आणून दिले 'असली थेरं माहेरी करा. इथे इथल्या रीतीने रहावं लागेल,' अशी समज मिळाली.
 घरी कुणी बाई बोलायला आली तरी सासरा आतबाहेर चकरा मारणार . कुणाला चहा करावा तर कपाटाच्या किल्ल्या सासऱ्याच्या कडोसरीला . नवरा तसा वरा . पण तो दिवसभर रानात आणि दुकानात . रात्रीच भेट. तेव्हाही दुसऱ्याच बोलण्याची घाई . शिवाय आईबापावेगळे लाडात वाढवलेले लेकरू. त्याला दुखवून चालणार नाही हा धाक . कमलच्या हाती उरलंय रडणं . फक्त रडणं, डोळे विरघळेस्तो रडणं.

विमा
 परवा विमा आली होती, तिखट हळद कुटायची का विचारायला. ही डी.एड झाली आहे. लहानपणापासून कामाची सवय. चार घरीधुणीभांडी , दळणकांडं करीत शिकली. वडील लहानपणीच वारलेले . घरी आई ,ही नि दोन वर्षानी धाकटा भाऊ. आई चार घरी धुणंभांडी करायची. विमल पास होत गेली. शिकत गेली. नकळत संसाराची स्वप्नं रंगवत गेली. पण दोन वर्षे झाली डी. एड होऊन. नोकरी नाही. मामा लग्न जमवायचा प्रयत्न करताहेत. पण त्यातही यश नाही. कधी रूप आडवं येतं , तर कधी गरीबी. आज खूप रडली. लोक म्हणतात, तुमची वस्तूही अशीतशीच नि पैसाही लावणार नाही. कसा जमावा सौदा?
 "परजातीत लग्न करते का? मी पहाते एखादा होतकरू मुलगा," मी विचारले.
 काही तरी भयंकर आपत्ती कोसळावी असा तिचा चेहरा .
 परजातीत? वाई जितं मारून टाकील मामा. मला सगळं पटतं हो. पण कुणाच्या आधारावर जात तोडू मी? एकादा बिजवर जरी समोर उभा केला तरी माळ घालायची. मी म्हणजे मढं झालंय. चालणारं ...बोलणारं ...तिचे डोळे अगदी भरभरून आले. तिने पटकन डोळे पुसले नि मिरचीचा डबा घेऊन ती निघून गेली . मन अस्वस्थ होतं . पण नुसतंच अस्वस्थ. शेवटी हे अस्वस्थपणही वांझोटंच!

वीणा
 अगदी अचानकपणे वीणा भेटली. जवळजवळ बारा वर्षांनी. मन उधाणून आलं . नवरा मोठ्ठा पगारदार . घरी मिक्सी , फोन , डायनिंग टेवल सगळं . पण ही

॥ ८० ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....