पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कमला
 कमला आलीय डोळे तपासायला , ही माझ्या अगदी दूरच्या नात्यातली. सासरेबुवांनी इथे आणून घातली. सतरंजीवर अवघडून बसलेली. उंचीपुरी, शेलाटी, चेहरा कसा दिसावा ? हातभर घुंगट काढून मान घालून बसलेली ही!
 आमी बाजारात जाऊन येताव. काई बोलणो, जिको बाईसानं बोलो. डागदरसाब थाका ससुरा लागे. ध्यानमा रखजो ...
 सासरेबुवांची सूचना . समजणाऱ्यांनी समजून घ्यावी , ती ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटली . शब्दांची खसखस नि पापण्यांची फडफड मला तलम घुंगटाआडूनही जाणवली. तिने पर्स उघडून विसाची नोट समोर टाकली . चप्पला टूटगी म्हारी. सासऱ्यांनी पैसे उचलले . काय करायची चप्पल नि फिप्पल. आजकाल छोऱ्याकी रीतही न्यारी निराली . सासरेबुवा कुरकुरत बाहेर.
 मला उकाडा असह्य झाला. दार लावून मी तरातरा आत आले नि तिचा घुंगट मागे ओढला. नही जी सासूजी. कोई देख्या तो . तिची दीनवाणी विनवणी .
 सासूजी गेली खड्डयात. घुंगट तुझा नि उकडतंय मला. हे काही धानोरे नाही नि तुझे सासरे पोचलेसुद्धा बाजारत. खुशाल खांद्यावर पदर घेऊन मोकळी होऊन बैस . आता जरा ती मोकळी झाली. अंगभर दागिने, अंगावर अगदी लेटेस्ट साडी. हातात घड्याळ , तरतरीत नाक, लांबट चेहरा, पाणीदार डोळे नि पापण्याची दाट झालर. पण त्यात अपार कारुण्य. डोळे सारखे दुखतात ही तिची तक्रार.
 का गं चुलीचा धूर सोसवेना का? मी हसून विचारले.
 ती पुन्हा गोरीमोरी झाली. गळ्यात हुंदके दाटून आले. अंग थरथरू लागले.
 माझ्या खांद्यावर माथा टेकून ती हमसून रडायला लागली.
 खरं सांगू भाबी ? रडून रडून डोळे विरघळून जाणार आहेत माझे. आंधळी होणार आहे मी. अजून सोळावं पुरं संपलं नाही तर बाईंनी लग्न लावून दिलं. विहिरीत ढकललं असतं तरी सुखानं मेले असते हो. हे जीवन सोसवत नाही मला . मग खूप रडते. खूप रडते.
 कमलचं माहेर बार्शीचं. विधवा आईची एकटी लेक , मॅट्रिकपर्यंत शिकलेली. अडुसष्ट टक्के गुण घेऊन पास झालेली . पण गरीबाची . कल्याण करण्याचा सोसही अनेकांना असतो. त्यात लग्नाची मध्यस्थी करून तर पुण्य मिळतं म्हणे . एक श्रीमंत शेटजींनी धानोऱ्याची सोयरीक आणली. आणि धर्म म्हणून लग्न करून दिले.
 मुलगा सातवी पास झालेला. थोराड अंगाचा, खेडवळ वळणाचा, आईबाप नसलेला . आजोबांच्या लाडात वाढलेला. घरी भरपूर शेती. किराणां दुकानही. सासऱ्याला हवी होती देखणी सून. सासूला हवा होता स्वस्तातला जावई मुरबी



शारदा, कमला ... अन स्त्रीमुक्ती वर्षही ॥७९॥