पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपली बारकुळीच. मी आपली भसाभस बोलत होते. पण हिचं बोलणं काहीसं मिटमिटतं. भेटीचा आनंद फक्त चेहऱ्यावर. पण ओठ गच्चच . वीणे, जरा माझा आदर्श घे. फार नाही. थोडा. इतकी कशी गं तू बारकुडी. सुखसुद्धा सोसता येऊ नये?
 नंतर दुसरीकडून कळलं. वीणाचा नवरा खूप दारू पितो. घरात जवळजवळ नसतोच. एरवी वागायला बरा.
 एक दिवस तिचं पत्र हातात पडलं.
 "लिहू नये पण लिहिते. सगळी दृश्य सुखं आहेत. पण मुन्नीचे वडील चिकार पितात. तुला माहीतच आहे माझं माहेर किती सोज्वळ! मोकळं वातावरण होतं तिथे. त्यांचं पिणं मी नाही सहन करू शकत. प्रचंड दुरावा आला आहे आमच्यात. दूर जाऊन मुक्त होण्याची ताकदही माझ्या मध्यमवर्गीय मनात नाही. मुक्त व्हावंसं फार वाटतंय....पण समोर-क्षितिज नाही. आज वाटतंय शिक्षणानं मन .... संस्कार दिले नसते तर फार बरं झालं असतं. निदान ही गुदमर तरी निर्माण झाली नसती."
 तिचं पत्र समोर पडलंय माझ्या. मला आठवतेय दोन वेण्या झुलवित खोखो खेळणारी वीणा.

मी
 तू इथे नसलीस की बोअर होतो बुवा मी. अरे, सुट्टी आहे तोवर ताजं जेऊ घाला आम्हाला. इथेच रहा बुवा तू." तो.
 "ते काही नाही हं. मी बिहारला जाणारेय. सुट्टीतच जमतं सगळं. मग आहेच बांधिलकी." मी.
 "तिथं या दिवसांत लू असते. माणसं पटापट मरतात सन्स्ट्रोकनं. बघ बुवा. आपण काही नाही म्हणत. नाही. पण तुला सोसवेल?" तो.
 "न सोसवायला काय झालंय ऽऽऽऽ?" मी.
 "शहादा, सोमनाथ , यूथ फेस्टिव्हल ...किती हिंडलीस या वर्षात? ए बिहार वगैरे नाही हं. वाटल्यास आईकडे जाऊन ये चार दिवस . आज काय तारीख आहे ? पंचवीस . पुढच्या चार तारखेला नाईट क्रीनवर येतो मी तुला घ्यायला. निघा आजच. बघ किती उदार आहे मी!" तो

܀܀܀



शारदा, कमला ... अन स्त्रीमुक्ती वर्षही ॥८१॥