पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बायकू वाळातीण . आपरीशन केलेलं. त्यो दोन म्हईने भुका . ह्ये हितं लिवायला . एकदा रातीचा काईबाई बोलाया लागला. मी इराकत कराया लागले तर तितंच आडविलं . नगं म्हणाया लागले तर म्हनला तुज्या नवऱ्याला सांगीन , तुझी बायको छिनाल हाय. काय करावं या भोगाला ? सांगा! दुसऱ्या दिशी पंचमीचं निमित्त करून थेट इथं आले ती गेलेच नाई. नवऱ्याला सरकारी पैशे मिळतात . कालरशिपीचे चाळीस नि पाच . त्यातून एकादं धडूतं घ्यावं म्हनलं तर म्हनतो भाऊ रागवल. चार म्हहिनं झालं हितं हाय. तशी त्यांचं समदं करते. खोली झाडते. दोगाबी मित्रांचा सैपाक करते. पानी ... सडा ... सरपण समदं . पर त्याला इतकुशी बी माया येईना. कदींची माय म्हणतीया . बाईकडे जा. एकादं लुगडं नि पोरांचे कपडे आण. बाळातपणात सोय हुईल. परं माझं मनच हुईना .
 बाई लगीन झालं नसतं तर होता का जंजाळ ? पर माईला कुटला ईसवास हाय? धरलं लेकरू न की बांधलं दावणीला ...
 तिचे डोळे भरून आलेलं . ती मुक्यानं , नजर नि पायाचा अंगठा जमिनीत रोवीत गच्च उभी रहाते.
 ही माझ्याघरी आली चार वर्षापूर्वी. जेमतेम अकरा वर्षांची असेल. गोरीपान , धरधरीत नाक, हिरवे गोंदण, छोटीला छान सांभाळायची. माझ्याबरोबर थेट पुण्यामुंबईपर्यंत हिंडून आली. कुणीही म्हणे कुणाची गं ? मारवाडी का ब्राह्मण? ही खरी चांभाराची पोर . अगदी सनातनी मारवाडी घरातही घरच्यांच्या पंक्तीत जेवून उठली. पण कुणाला संशय आला नाही. कामातही हिची नेहमी लुडबूड . गॅसवर चपात्या करणं ,मिक्सरवर चटण्या वाटणं ,बटाटेवडे , दहिवडे सगळं हौशीने शिकली. आम्ही घरी नसताना येणाऱ्या पाहुण्यांची कशी आवभगत करायची! कुणाला चहा द्यायचा, कुणाला जेऊ घालायचं याची गणितंही हिला पटापट जमली. एक दिवस तिची माय आली. म्हणू लागली बाई पोर शाणी झालीया, लगीन करावं म्हणते. चौदा वर्षाच्या पोरीचं लग्न. कसंसंच वाटलं. इतकी घाई कशाला? जाऊ द्या चार वर्ष. मग मी सुद्धा पाहीन चांगलासा मुलगा, मी समजावण्याचा प्रयत्न केला.
 अवं जेचा माल त्येच्या पदरात . माझ्यावर ओझं नगं. शाणी पोर घरात ठेवायची म्हंजी पदरात इस्तू बांधून ऱ्हायचं. तिचा ठोक हिशोब .
 शारदाचं लग्न झालं . अवघ्या आठ नऊ महिन्यांपूर्वी . आज माझ्यासमोर शारदा उभी होती. पंधरा वर्षांची. कृश शरीर . पिळवटलेली नजर . उंचावलेले पोट , पोटाचा भार शरीराला पेलवेनासा झालाय. मनाला तर कुठला पेलवणार? पण पोरीच्या मनाचा विचार कोण करणार? का करणार?

॥ ७८ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....