पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नव्या सावित्रीत आणि जुन्या सावित्रीत एक साम्य आहे. ते म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशाच्या दिशेने जाण्याची जिद्द . . 'तमसो मा ज्योतिर्गमय' चा ध्यास . माझ्या खेड्यापाड्यातल्या भूमिकन्यांना हा नवा विचार नक्कीच सांगता येईल. पण डोळे असून ते मिटून घेतलेल्या शिक्षित भगिनींच्या मनावर चढलेली बुरशी कशी दूर होईल?
 आंब्याच्या कोयीवरून घसरून किती दूर आले मी! तर आता जून उजाडलाय. दर वर्षी तो ठरल्याप्रमाणे येतच राहील. उद्या एखादी नाचरी सर झिमझिमून जाईल . उन्हाचे धुळकट राप गळून पडतील , वाहून जातील. मन पुन्हा एकदा ताजेतवान होऊन. नव्या ऋतुचे, नव्या विचाराचे, नव्या ज्ञानाचे स्वागत करण्यासाठी उत्साहाने भरून जाईल. अशा वेळी माझ्याही ओठावर येतील स्वरगंधात न्हालेले ओलेचिंब शब्द .
 लाख धारांचा ... धारांचा
 कसा सोसावा बहर ?
 काळ्या रेशमी पोतात
 जडवीले निळे मोर ऽऽ
 चहु अंगांनी ... चहु अंगांनी
 रान मोरांचे ... मोरांचे
 लाख डोळ्यांचे शहार
 अंग रंगात ... संगात
 सहा ऋतूंचे वहर
 चहु अंगानी ... चहु अंगांनी ...

܀܀܀

॥ ७६ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....