पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अप्पामामाला हापूसच्या पेट्या आणायचा भारी शौक. भाचरांना भरभरून आंबे खाऊ घालण्यात त्याला आनंद असे . आई नि मावशीला पाहून गुरुजींचे डोळे , चकाकत . त्यांच्या ताटातले रत्नागिरी हापुसचे आंवे त्यांच्या डोळ्यांना , नाकाला अगदी भिडून जात . त्यांना माहीत असे की इथले आंबे चोखे रायवळ असणार नाहीत . पूजा सांगून झाली की ताटातले रसरशीत पिवळे आंवे अगदी हळुवार हातांनी ते उपरण्यात बांधत.
 वय वाढत गेले तसे सत्यवानाची सावित्री अधिक उमजू लागली . यमाला प्रश्न विचारणारी . त्याच्याशी वादप्रतिवाद करणारी, शब्दांच्या जाळ्यात गुंगवून त्याच्याकडून पतीचे प्राण आणणारी सावित्री.. पण या सावित्रीच्या चातुर्याकडे लक्ष न देता , वडाला दोरा गुंडाळणाऱ्या नि हळदीकुंकवाच्या पूजेत धन्यता मानणाऱ्या स्त्रिया पाहून मन वैतागत असे . याच सुमारास ओळख झाली नव्या सावित्रीशी. शेणकचऱ्याचा मारा फुलासारखा झेलून पोरीवाळीसाठी शाळा चालवणारी, ज्योतीवाची सावित्री ! पतिपत्नींच्या सहजीवनाचा इतका सुंदर आविष्कार मनाला मोहवून गेला. ज्योतीवाच्या हृदयातील प्रत्येक नवा विचार या सावित्रीने आत्मसात केला. पोकळ पातिव्रत्याचा नव्हे तर पतिपत्नीमधील सुजाण वांधिलकीचा नवा ऋजू आदर्श सहजपणे मनावर खोल खोल कोरला गेला. या सावित्रीने महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाची ज्योत चेतवली. अंधारयात्री स्त्रियांना प्रकाशाची वाट दाखवली. आज महाराष्ट्रात स्त्रिया विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. या सावित्रीची आठवण किती जणींना येते? आठवण जाऊ द्या, पण किती जणींना या सावित्रीच्या कर्तृत्त्वाची खरीखुरी ओळख असते?
 आपला जोडीदार दीर्घायुषी व्हावा , त्याची साथसंगत आयुष्यभर लाभावी असे कोणाला वाटत नाही आणि वाटणार नहीं ? पण तो साथी असायला हवा. आश्वासक श्वासांनी फुलवणारा जोडीदार हवा. कितीजणांना असा साथीदार मिळतो? माहेरातून सोनेनाणे वा भेटवस्तू आणण्यासाठी पत्नीचा छळ करणाऱ्या ,तिला मारणाऱ्या, नरपशूबद्दल तो केवळ नवरा आहे . म्हणून कितीजणींना अंतरात्म्यातून प्रेम ...ओढ वाटत असेल? आणि वडाची पूजा करून का कुणाचे आयुष्य वाढवता येते? हे का कळत नसेल त्यांना? पण हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा कुणी नि कशा तोडायच्या? जग काय म्हणेल? हे सारे कळूनही वडाला दोरा वांधण्यात धन्यता मानणाऱ्या स्त्रिया कमी का आहेत?
 अलीकडे वडाच्या पारावर जायला लाज तर वाटते. पण व्रत न केल्यास काय घडेल याचे भयही वाटते . मग कुंडीतल्या वडाच्या फांदीची पूजा करायची ! हे असं का ? कधी संपणार ही अज्ञानयात्रा? या व्रताला नवे रूप का देऊ नये? व्रताच्या भोवती एक गोडवा असतो. मानसिक निर्धार असतो . त्या निमित्ताने अनेकजणीचे एकत्र येणे , मनाची झटकून जाणारी मरगळ , गाणी, जगण्याच्या आनंदाचा प्रत्यय



आंब्याच्या कोयीवरून घसरताना ॥७५॥